राहुल गांधींपर्यंत तो एक निरोप पोहोचला नाही आणि...; मिलिंद देवरांच्या राजीनाम्याची 'इनसाइड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:52 PM2024-01-14T12:52:03+5:302024-01-14T13:03:36+5:30

राजीनामा देण्याआधी मिलिंद देवरा हे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे.

A message did not reach Rahul Gandhi Inside Story of congress Milind Deora Resignation | राहुल गांधींपर्यंत तो एक निरोप पोहोचला नाही आणि...; मिलिंद देवरांच्या राजीनाम्याची 'इनसाइड स्टोरी'

राहुल गांधींपर्यंत तो एक निरोप पोहोचला नाही आणि...; मिलिंद देवरांच्या राजीनाम्याची 'इनसाइड स्टोरी'

Milind Deora ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असून आज राजधानी मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला असून ते आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र राजीनामा देण्याआधी मिलिंद देवरा हे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. तसंच देवरा यांनी जयराम रमेश यांच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक निरोपही पाठवला होता, असे समजते. मात्र तो निरोप राहुल गांधींकडे पोहोचण्याआधीच देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष एकत्रितपणे आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मात्र या आघाडीसमोर जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईची जागा आपल्याला मिळावी, यासाठी मिलिंद देवरा आग्रही होते. मात्र या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळणं कठीण होतं. परंतु मागील दोन निवडणुकांत मोदीलाटेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार इथून निवडून आला असून यंदा त्यांच्यामागे मोदींच्या ताकद नसल्याने ही जागा आपल्या पदरात पाडून घ्यावी, असा आग्रह देवरा यांनी धरला होता. हाच निरोप त्यांनी जयराम रमेश यांच्या माध्यमातून राहुल गांधींकडे पाठवला होता. मात्र हा निरोप राहुल गांधींकडे न पोहोचल्याने अखेर आज मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.

जयराम रमेश यांचा देवरांवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून मणिपूर येथून सुरू होत आहे. मात्र या यात्रेच्या सुरुवातीलाच मिलिंदा देवरा यांनी राजीनाम्याच्या बॉम्ब टाकला. मात्र देवरा यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवला असल्याचा हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला आहे. जयराम रमेश यांनी मिलिंद देवरा यांचे वडील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य करत एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मुरली देवरा यांच्यासोबतचा माझा प्रदीर्घ काळाचा सहवास मला आठवतो. सर्व राजकीय पक्षांमध्ये देवरा यांचे जिवलग मित्र होते, मात्र ते चांगल्या आणि कठीण काळातही ठामपणे काँग्रेससोबत उभे राहिले होते."

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असलेल्या मिलिंद देवरा यांना महायुतीकडून लोकसभेचं तिकीट दिलं जातं की राज्यसभेवर संधी दिली जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: A message did not reach Rahul Gandhi Inside Story of congress Milind Deora Resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.