"निवडणुकांनंतर मध्यमवर्गाच्या बचतीवर पुन्हा व्याज कमी करू लूट केली जाणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:06 PM2021-04-01T16:06:16+5:302021-04-01T16:10:25+5:30
राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा. केंद्रानं बचत योजनांवरील व्याजदरात कपातीचा निर्णय घेतला मागे.
केंद्र सरकारने बुधवारी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयाने अनेक सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. अनेक स्तरातून केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर या निर्णयावर केंद्र सरकारने यू टर्न घेत हा निर्णय परत घेत असल्याची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. यानंतर काँग्रसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी यावरून केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला.
"पेट्रोल डिझेलवर तर पहिल्यापासूनच लूट सुरू होती. निवडणुकी संपल्यावर मध्यमवर्गाच्या बचतीवर पुन्हा व्याज कमी करून लूट केली जाईल. हे जुमला आणि खोट्या लोकांचं जनतेची लूट करणारं सरकार आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली.
पेट्रोल-डीज़ल पर तो पहले से ही लूट थी, चुनाव ख़त्म होते ही मध्यवर्ग की बचत पर फिर से ब्याज कम करके लूट की जाएगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 1, 2021
जुमलों की झूठ की
ये सरकार जनता से लूट की!#Oversight
काय आहे विषय?
"केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, २०२०-२१ च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे," असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.
काय होता निर्णय?
अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का देत व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात केली होती. पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. परंतु केंद्राच्या निर्णयामुळे तो ६.४ टक्क्यांवर आला होता. मात्र आता पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याजदर मिळणार आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (National Savings Certificate) व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.