महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 05:38 PM2024-11-26T17:38:32+5:302024-11-26T17:39:06+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता, काँग्रेसने ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता, काँग्रेसने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करत, देशव्यापी अभियान चलावण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात बोलताना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मंगळवारी म्हणाले, बॅलेट पेपरने निवडणुका व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही 'भारत जोडो यात्रे'च्या धरतीवर संपूर्ण देशभरात मोहीम चलवू.
खर्गे म्हणाले, 'मी एक गोष्ट सांगेन की, ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकातील लोक जी मते टाकत आहेत ती वाया जात आहेत. आमचे म्हणणे आहे की, सर्व सोडा आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान करा. त्या लोकांना त्यांच्या घरात मशीन ठेवू द्या. अहमदाबादमध्ये बरीच गोदामे आहेत, त्यांनी तेथे मशिन्स नेऊन ठेवावीत. आमची एकच मागणी आहे की, निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमाने घ्याव्यात. असे झाल्यास आपण कुठे उभे आहोत, हे या लोकांना कळेल.
खर्गे म्हणाले, 'माझे म्हणणे आहे की, आपल्या पक्षाने एक मोहीम सुरू करायला हवी आणि त्यासाठी सर्व पक्षांनीही सोबत घ्यायला हवे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण देशभरात 'भारत जोडो यात्रे'च्या धरतीवर एक मोहीम चालवू.' यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जातवार जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जातवार जनगणना करण्यास घाबरतात. मात्र, समाजातील प्रत्येक घटकाला आपला वाटा हवा आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवे."
खर्गे पुढे म्हणाले, जर आपल्याला खरोखरच देशात एकता हवी असेल, तर द्वेश पसरवणे बंद करावे लागेल, एवढेच नाही तर, संविधान दिनानिमित्त खर्गे यांनी अशी मागणीही केली की, यावर दोन दिवस संसदेत चर्चा व्हायला हवी. जेणेकरून लोकांना संविधानासंदर्भात माहिती मिळेल आणि त्याचे संरक्षण कशा प्रकारे करता येईल, यावरही चर्चा होईल.