ममता बॅनर्जी, भगवंत मान यांच्यानंतर नितीश कुमारांनी काँग्रेसला दिला धक्का, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:53 PM2024-01-25T13:53:21+5:302024-01-25T13:54:31+5:30
Nitish Kumar News: आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वादविवादांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र या यात्रेदरम्यानच इंडिया आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्का देत आहेत.
आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वादविवादांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र या यात्रेदरम्यानच इंडिया आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्का देत आहेत. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींच्या या यात्रेस सहभागी होणार नसल्याचे सांगत स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची घोषणा केली होती. तर भगवंत मान यांनीही पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही काँग्रेसला धक्का दिला आहे. नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे.
सध्या बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या बातम्या वरचेवर येत आहेत. नितीश कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून मित्रपक्ष असलेल्या आरजेडीपासून अंतर ठेवून वागण्यास सुरुवात केली आहे. तसेच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न सन्मान देण्याची घोषणा झाल्यानंतर नितीश कुमार यांनी घराणेशाहीवर टीका केली होती. त्यामधून नितीश कुमार यांनी लालूंच्या आरजेडीपासून आपण दुरावत असल्याचे संकेत दिले होते. आता नितीश कुमार यांनी भारत जोडो न्याय यात्रेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने ते इंडिया आघाडीपासून दूर होत असून, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आपला वेगळा मार्ग निवडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यामध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या जयंती समारंभामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले होते की, कर्पुरी ठाकूर यांनी आपल्या कुटुंबाला राजकारणात पुढे आणलं नाही. मात्र आजकाल काही लोक केवळ आपल्या कुटुंबाला पुढे आणत आहेत. नितीश कुमार यांनी यावेळी कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र राजकारणात वाढत असलेल्या घराणेशाहीला आक्रमकपणे लक्ष्य केले. यावेळी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्याबद्दल नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले.