राहुल गांधी यांचा बंगला कोणत्या खासदाराला?; आवराआवरी अन् सरकारचीही तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 08:53 AM2023-03-31T08:53:10+5:302023-03-31T08:53:30+5:30
बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल.
- सुनील चावके
नवी दिल्ली : खासदारकी रद्द झाल्यामुळे चर्चेत आलेला ल्युटन्स दिल्लीतील १२, तुघलक लेन बंगला सोडण्यासाठी राहुल गांधी तत्परता दाखवीत असताना हा बंगला रिकामा होताच वेळ न दवडता नव्या व्यक्तीला त्याचे वाटप करण्यासाठी लोकसभेची आवास समितीही तत्पर असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी १९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले, त्यावेळी त्यांना २००५ साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने एसपीजी सुरक्षेच्या नावाखाली कॅबिनेटमंत्र्यांना दिला जातो त्या श्रेणीतील १२, तुघलक लेन बंगला दिला होता. राहुल गांधी यांच्या बंगल्यातील सामानाची बांधाबांध सुरू झाली असून, ते येत्या काही दिवसांतच बंगला सोडणार असल्याचे समजते. बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल. खासदार सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती विलंब न लावता राहुल यांचा बंगला कोणत्या खासदाराला देते, याकडे लक्ष लागले आहे.
या बंगल्यांकडे कानाडोळा का?
दिल्लीत सध्या गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, डॉ. सुब्रमण्यम स्वामी ही मंडळी संसदेच्या सभागृहाचे सदस्य नसताना सरकारी बंगल्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी काहींना अतिरेक्यांकडून धोका असल्याच्या कारणाखाली बंगले देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर राजस्थानचे आमदार असलेले काँग्रेसचे सचिन पायलट यांचाही ल्युटन्समधील बंगला शाबूत आहे. राहुल यांना बंगला सोडण्यासाठी निर्देश देताना या नेत्यांकडे कानाडोळा का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.