राहुल गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेस सोशल मीडियावरही झाला सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:08 AM2019-01-29T06:08:48+5:302019-01-29T06:09:08+5:30
प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे. या योजनेवरून भाजपने हल्ला करायच्या आधी काँग्रेसला त्याचा एवढा प्रचार करायचा आहे की भाजपचा हल्ला बोथट व्हावा.
राहुल गांधी यांनी स्वत: व्यासपीठावर ती घोषणा केली व लगेचच फेसबुकवर पोस्ट केले की ‘आमचे लक्षावधी बंधू-भगिनी गरीबीशी संघर्ष करीत असेपर्यंत आम्ही नवा भारत घडवू शकत नाही. २०१९ मध्ये आम्ही केंद्रात सत्तेवर आलो तर काँग्रेस किमान उत्पन्न हमी योजना सुरू करण्यास बांधिल आहे. या योजनेमुळे प्रत्येक प्रत्येक गरीबाला मदत मिळेल आणि गरीबी नष्ट करायला मदत मिळेल. हे आमचे आश्वासन आणि दृष्टिकोणही आहे.’ या पोस्टनंतर पी. चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर राहुल यांची ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे सांगून ही योजना गरीबांसाठी गेमचेंजर म्हटले. ते म्हणतात, ‘युबीआयबद्दल गेल्या दोन वर्षांत चर्चा झाली. आता ती स्वीकारण्याची वेळ आली आहे म्हणजे गरीबांसाठी ती राबवता येऊ शकेल. याचा अधिक तपशील काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात देईल.’
चिदंबरम यांनी आकडेवारी देऊन लिहिले की, ‘१.४८ लाख लोकांना २००४ ते २०१४ दरम्यान दारिद्र्य रेषेवर आणले गेले. आता गरीबी मूळापासून काढून टाकण्याची वेळ आली आहे. काँग्रेस राहुल गांधी यांचे आश्वासन पूर्ण करील.’ राहुल आणि चिदंबरम यांच्या पोस्ट आणि टिष्ट्वटने हे स्पष्ट केले की, काँग्रेस इंदिरा गांधी यांच्या मार्गांनी प्रवास करण्यास कटिबद्ध आहे. इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाओ’ घोषणा केली होती. आज काँग्रेस पुन्हा तेच आश्वासन सत्यात आणण्यासाठी २०१९ मध्ये विरोधकांशी दोन हात करील.