'सावरकर समझा क्या...नाम- राहुल गांधी है'; काँग्रेसचं ट्विट; भाजपा नेते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:43 AM2023-03-20T10:43:54+5:302023-03-20T10:45:00+5:30
काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही असा टोला भाजपाने लगावला.
नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी देशाबाहेर केलेल्या विधानावरून संसदेत गदारोळ माजलेला असताना रविवारी काँग्रेसनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. काँग्रेसनं रविवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून "सावरकर समझा क्या..नाम राहुल गांधी है" असं ट्विट केले. पोलीस चौकशीनंतर राहुल त्यांच्या घरी जाताना स्वत: कार चालवत गेले तेव्हाचा फोटो पोस्ट करत त्यावर कॅप्शन दिले आहे.
काँग्रेसच्या या ट्विटवरून भाजपा नेते आणि विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, कृपया महान आत्मा वीर सावरकर यांचा अपमान नका करू. हात जोडून विनंती करत आहे. मनुष्याची चारित्र्याची महानता तोच जाणू शकतो ज्याने त्यागाची किंमत जाणली आहे. तर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी लोकशाहीची सर्व मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेस पक्ष मानसिक आजाराने ग्रस्त आहे. काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला. त्याचसोबत भाजपा विचारधारा असणारी पार्टी आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वावर भाजपा पुढे जात आहे असंही जे पी नड्डा यांनी म्हटलं.
दरम्यान, अदानीवर संकट आल्यानंतर राहुल गांधींविरोधात तपास सुरू होतो. अदानींना वाचवण्यासाठी सगळा खेळ खेळला जातो. मालकाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात उतरले आहे. आम्ही अदानी महाघोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारले त्यामुळे हुकुमशाह सरकारने पोलीस पाठवले. त्यांना वाटले आम्ही घाबरू. माफी मागू. परंतु हे सहन करणार नाही. आम्ही सावरकर भक्त नाही. बापूंचे अनुयायी आहे. ना घाबरणार, ना हरणार आणि आम्हीच जिंकणार असं काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या अखेरच्या दिवशी आजही महिलांचे शोषण होत आहे असं विधान केले होते. त्यावरून दिल्ली पोलिसांनी १६ मार्चला राहुल गांधींना नोटीस पाठवून ती महिला कोण? ज्याने हे सांगितले असं उत्तर मागितले आहे. राहुल गांधींनी महिलेची डिटेल्स दिल्ली पोलिसांना दिली. राहुल गांधींच्या याच विधानाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहचली होती.