"देशात विचारधारेचे युद्ध, 'भारत जोडो' vs 'भारत तोडो", राहुल गांधींची भाजपवर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 01:00 PM2023-06-23T13:00:59+5:302023-06-23T13:01:32+5:30
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची बैठक होत आहे.
पाटणा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला एका सभेला संबोधित करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजप म्हणजे फक्त २-३ लोकांना फायदा देणे असून आम्ही देशात प्रेम पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्ष एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येते बैठक घेत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.
दरम्यान, पाटण्यातील एका सभेत बोलताना राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. "आम्ही तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान जिंकू आणि तिथे भाजप कुठेच दिसणार नाही. आम्ही गरिबांच्या पाठीशी उभे आहोत म्हणूनच आम्ही विजय संपादन करू. कारण भाजप म्हणजे फक्त २-३ लोकांना फायदा देणे आहे. भाजप द्वेष, हिंसाचार आणि देश तोडण्याचे काम करत आहे. तर आम्ही प्रेम पसरवण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी काम करत आहोत. विरोधी पक्ष आज येथे आले आहेत आणि आम्ही एकत्रितपणे भाजपचा पराभव करू", असे राहुल गांधींनी सांगितले.
#WATCH | BJP is working to spread hate, violence and break the country. We are working to spread love and unite. Opposition parties have come here today and together we will defeat BJP: Congress leader Rahul Gandhi, in Bihar's Patna pic.twitter.com/fyIQtVrtZd
— ANI (@ANI) June 23, 2023
सत्ताधारी भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात विचारधारेचे युद्ध सुरू असून एका बाजूला काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो' विचारधारा आहे तर दुसरीकडे आरएसएस आणि भाजपची 'भारत तोडो' ही विचारधारा आहे. काँग्रेस पक्षाचा डीएनए बिहारमध्ये आहे.
#WATCH | There is a war of ideology going on in India. On one side is Congress party's 'Bharat Jodo' ideology and on the other RSS and BJP's 'Bharat Todo' ideology ...Congress party's DNA is in Bihar, says Congress leader Rahul Gandhi to party workers in Bihar's Patna pic.twitter.com/XRov71pSB6
— ANI (@ANI) June 23, 2023
विरोधी पक्षातील दिग्गजांची हजेरी
दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा यांसह इतरही काही नेत्यांची उपस्थिती असणार आहे.