Akhilesh Yadav : "राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप व्हावं, अन्यथा..."; अखिलेश यादवांची काँग्रेससमोर अट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 11:11 AM2024-01-07T11:11:29+5:302024-01-07T11:20:31+5:30
Akhilesh Yadav And Congress Rahul Gandhi : उत्तर प्रदेशचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव शनिवारी बलियामध्ये होते आणि त्यांनी बलियामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळे एकंदरीत उत्तर प्रदेशचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याच दरम्यान अखिलेश यांना उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींसोबतच्या यात्रेत सामील होणार का?, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी इंडिया आघाडीमध्ये जागावाटप होत असेल, तर या यात्रेतही सहभागी होऊ, असं स्पष्ट उत्तर दिलं आहे.
पत्रकारांनी अखिलेश यादव यांना "राहुल गांधी ज्या पद्धतीने न्याय यात्रा इथे घेऊन आहेत, त्यावरून तुम्हाला काय वाटतं, ही यात्रा काँग्रेसची यात्रा आहे की इंडिया आघाडीची यात्रा आहे?" असा प्रश्न विचारला. त्यावर अखिलेश यादव यांनी राहुल गांधींची यात्रा उत्तर प्रदेशात पोहोचण्यापूर्वी जागांचे वाटप झाले तर ते यात्रेतही दिसतील, मात्र जागांचे वाटप झाले नाही तर सपा दिसणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
"प्रत्येकजण, विशेषत: सर्व उमेदवार त्यांच्या य़ात्रेमध्ये भक्कमपणे उभे राहताना दिसतील. म्हणजेच सध्या ही काँग्रेसची यात्रा आहे आणि आम्हाला आशा आहे की काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून लढू इच्छिणाऱ्या सर्व विरोधी पक्षांना या यात्रेपूर्वी सर्व राज्यातील जागा वाटून दिल्या जातील, ज्यामुळे पक्ष आणखी मजबूत होईल आणि ही लढाई अधिक ताकदीने लढता येईल."
"यात्रा होत आहे ही चांगली गोष्ट आहे, पण सर्वच पक्षांची इच्छा आहे की यात्रेपूर्वी तिकीट आणि जागावाटप व्हावं. जागावाटप झालं तर यात्रेमध्ये अनेक लोक हे स्वत:हून सहकार्यासाठी बाहेर पडतील. कारण निवडणूक लढवणारा उमेदवार तिथे पूर्ण जबाबदारीने उभा असलेला दिसेल" असं देखील अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.