अमेठी सिंगापूर बनली का? स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:54 PM2019-04-10T16:54:07+5:302019-04-10T16:55:08+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे.
अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. अमेठीला सिंगापूर बनवू असा वारंवार दावा करणाऱ्या राहुल गांधींना स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. अमेठी सिंगापूर बनली का? असा सवाल त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे.
राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. दरम्यान, आज नामांकन दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मोठा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी, भाओजी रॉबर्ट वाड्रा आणि भाचा रिहान आणि भाची मिराया हेसुद्धा उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना आव्हान देणाऱ्या स्मृती इराणी या गुरुवारी आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ''राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अमेठीमध्ये विकास कामे झाली आहेत. इथे जो काही विकास झाला आहे तो भाजपामुळे झाला आहे.''असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. आपण अमेठी सोडून जाणार नाही. येथील जनतेची लढाई त्यांच्यासोबत राहूनच लढू असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला.
राहुल गांधी हे 2004 मध्ये प्रथमच अमेठी मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हापासून ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी सहजपणे विजय मिळवला होता. मात्र 2014 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.