राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसमध्ये फुटाफूट सुरूच, अजून एका युवा नेत्याने सोडला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:48 AM2022-09-12T11:48:22+5:302022-09-12T12:10:39+5:30
Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान, विविध राज्यांतील आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देणे सुरूच आहे. आता आसाममध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
गुवाहाटी - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा निघाली आहे. मात्र या यात्रेदरम्यान, विविध राज्यांतील आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देणे सुरूच आहे. आता आसाममध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कमरुल इस्लाम चौधरी यांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी आसाम काँग्रेसच्या दिशाहीन आणि भ्रमित नेतृत्वावर टीकेचा घणाघात करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा रविवारी राजीनामा दिला. कमरुल इस्लाम यांनी एआयसीसीच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
त्यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये लिहिले की, गेल्या काही महिन्यांदरम्यान, एपीसीसीच्या दीशाहीन आणि भ्रमित नेतृत्वामुळे आसाममध्ये काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या अस्थिरतेने माझ्यासाठी आयएनसीच्या सदस्याच्या रूपात कायम राहण्यासाठी कुठलंही कारण बाकी ठेवलेलं नाही. राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्यांविरोधात कुठलीही कारवाई करण्यात न आल्याबद्दलही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामधून नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी लिहिले की, हल्लीच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये नेत्यांनी क्रॉस वोटिंग केले. त्यांनी स्वत:ही हे मान्य केले. एपीसीसी अध्यक्ष भूपेन बोरा यांच्यासह राज्याच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी अशा आमदारांना सार्वजनिकरीत्या गद्दार म्हटले आहे. मात्र त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना निराश केले आहे. त्यांनी अनेक वर्षांपर्यंत पक्षासाठी घाम गाळलेला आहे.