CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 05:30 PM2020-01-12T17:30:01+5:302020-01-12T17:32:10+5:30

कितीही विरोध करा, नागरिकत्व देणारच; शहांचा काँग्रेसवर निशाणा

amit shah attacks opposition over caa challenges rahul gandhi mamta banerjee | CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

Next

जबलपूर: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं कितीही विरोध केला तरीही आम्ही सर्वांना नागरिकत्व देणारच, अशा शब्दांत शहा काँग्रेसवर बरसले. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये बोलत होते. 
 




भारतावर जितका तुमचा आणि माझा अधिकार आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानहून आलेल्या शरणार्थींचादेखील असल्याचं शहा म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 'आज काँग्रेस नेते देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं करत आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थींना स्वीकारा, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसला महात्मा गांधींचा विसर पडला आहे,' अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर टीका केली. 
 




काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशाच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहांनी केला. नागरिकत्व कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. उलट या कायद्याच्या आधारे नागरिकत्व दिलं जाणार आहे, असं गृहमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्यास राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींनी ती शोधून दाखवावी, असं थेट आव्हान शहांनी दिलं. 




'काँग्रेसनं धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधल्या हिंदू, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारतात यायचं आहे. मात्र त्यावेळची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे आपल्या देशातल्या सर्व नेत्यांनी त्यांना तिथेच राहण्याचा सल्ला दिला. भविष्यात तुम्ही भारतात याल, तेव्हा तुमचं स्वागत होईल. तुम्हाला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, असं आश्वासन त्यावेळी भारतातल्या नेत्यांनी पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना दिलं होतं,' असं शहा म्हणाले. 

Web Title: amit shah attacks opposition over caa challenges rahul gandhi mamta banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.