Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 08:37 AM2018-08-31T08:37:59+5:302018-08-31T08:46:42+5:30
Rafale Deal Controversy: राफेल खरेदी प्रकरणावरुन भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये जुंपली
नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाभाजपा अध्यक्ष अमित शहांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देशाचा आयक्यू (बुद्धांक) राहुल गांधींच्या आयक्यूपेक्षा जास्त आहे, अशा शब्दांमध्ये अमित शहांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधींनी राफेल करारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन राफेल कराराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींनी ट्विट करुन केलेल्या या मागणीला अमित शहांनी ट्विटरवरच उत्तर दिलं आहे. संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसी म्हणजे जुठी पार्टी काँग्रेस असल्याचं शहांनी म्हटलं आहे. राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी बोलताना राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'दिल्ली, कर्नाटक, रायपूर, हैदराबाद, जयपूर आणि संसदेत बोलतात राहुल यांनी राफेलची किंमत वेगळी सांगितली,' असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हाच मुद्दा उपस्थित केला होता.
Why wait 24 hours when you already have your JPC-Jhoothi Party Congress.
— Amit Shah (@AmitShah) August 29, 2018
Your lies to fool the nation are self-evident when Rafale price you quote vary in Delhi, Karnataka, Raipur, Hyderabad, Jaipur & Parliament.
But the nation's IQ is higher than yours!https://t.co/5fQlS7gV1Lhttps://t.co/69IkaKeXSZ
'तुमच्याकडे तुमची जेपीसी (जुठी पार्टी काँग्रेस) असताना दुसऱ्या जेपीसीची (संयुक्त संसदीय समिती) गरज काय? तुम्ही प्रत्येक ठिकाणी राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगून देशाला मूर्ख बनवत आहात. मात्र देशाचा आयक्यू तुमच्या आयक्यूपेक्षा खूप जास्त आहे,' अशा शब्दांमध्ये अमित शहांनी राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राहुल गांधींनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत राफेल खरेदीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 'राफेल करार प्रकरणावर देशाचं लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद,' असं राहुल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. राफेल विमान खरेदीचा उल्लेख ग्रेट राफेल रॉबरी असा करत मोदी त्यांच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला होता.