काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवर अमित शाहंचा हल्लाबोल; राहुल गांधींना विचारले 10 प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 06:27 PM2024-08-23T18:27:14+5:302024-08-23T18:28:02+5:30
Amit Shah On Rahul Gandhi : आगामी जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने युती केली आहे.
Amit Shah On Rahul Gandhi : जम्मू-काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Assembly Election) निवडणुकीची घोषणा होताच काँग्रेस (Congress) आणि नॅशनल कॉन्फरन्सने (National Conference) युती केली आहे. या युतीवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जोरदार टीका केली असून, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 10 प्रश्नही विचारले आहेत.
अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधला. "सत्तेच्या लालसेपोटी देशाच्या एकतेशी आणि सुरक्षेशी वारंवार खेळ करणाऱ्या काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला कुटुंबाच्या ‘नॅशनल कॉन्फरन्स’शी युती करून आपले मनसुबे पुन्हा एकदा देशासमोर ठेवले आहेत," अशी टीका शाह यांनी केली. यासोबतच त्यांनी राहुल गांधींना 10 प्रश्नही विचारले.
अमित शाहंचे प्रश्न:-
- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा 'वेगळा झेंडा' लावण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या आश्वासनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का?
- कलम 370 आणि कलम 35A परत लागून करुन जम्मू आणि काश्मीरला पुन्हा अशांतता आणि दहशतवादाच्या युगात ढकलण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या आश्वासनाला राहुल गांधी आणि काँग्रेसचा पाठिंबा आहे का?
- काश्मीरमधील तरुणांऐवजी पाकिस्तानशी चर्चा करून पुन्हा फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याला काँग्रेसचे समर्थन आहे का?
- नॅशनल कॉन्फरन्सच्या पाकिस्तानसोबत 'एलओसी ट्रेड' सुरू करण्याच्या निर्णयामुळे सीमेपलीकडील दहशतवाद आणि त्याच्या परिसंस्थेच्या पोषणाला काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी पाठिंबा देतात का?
- दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्या बहाल करून दहशतवादाचे युग परत आणण्यास काँग्रेसचे समर्थन आहे का?
- या आघाडीमुळे काँग्रेस पक्षाचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे. दलित, गुज्जर, बकरवाल आणि पहाडी लोकांचे आरक्षण संपवून त्यांच्यावर पुन्हा अन्याय करण्याचे जेकेएनसीचे आश्वासन काँग्रेसला मान्य आहे का?
- ‘शंकराचार्य पर्वत’ ‘तख्त-ए-सुलीमान’ आणि ‘हरी पर्वत’ ‘कोह-ए-मारन’ म्हणून ओळखला जावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे का?
- जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आगीत आणि पाकिस्तानला पाठिंबा असलेल्या मोजक्या कुटुंबांच्या हातात देण्यास काँग्रेसचे समर्थन आहे का?
- जम्मू आणि खोऱ्यातील भेदभावाच्या जेकेएनसीच्या राजकारणाला काँग्रेस पक्ष समर्थन देतो का?
- काँग्रेस आणि राहुल गांधी जेकेएनसीच्या फुटीरतावादी विचारसरणीचे आणि काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या धोरणांचे समर्थन करतात का?
खर्गे-राहुल यांची फारुख अब्दुल्लांसोबत बैठक
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत आघाडी करण्याची घोषणा केली.