कौतुकास्पद! आई अंगणवाडी सेविका तर वडील शेतकरी; 30 व्या वर्षी लेक झाला महापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:35 AM2022-07-18T09:35:41+5:302022-07-18T09:43:08+5:30
Vikram Ahakey : महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार विक्रम आहाके यांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. आई अंगणवाडी सेविका आणि वडील शेतकरी असलेला एक तरुण 30 व्या वर्षी महापौर झाला आहे. छिंदवाडा महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार विक्रम आहाके यांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. याचं कारण म्हणजे गरीब शेतकरी कुटुंबातील विक्रम वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी महापौर होणार आहेत.
विक्रम आहाके हे छिंदवाडा जिल्ह्यातील राजाखोह गावातील रहिवासी आहे. त्यांचे वडील नरेश आहाके हे शेतकरी आहेत तर आई निर्मला अंगणवाडी सेविका आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेल्या विक्रम यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे. शेती हाच त्याचा मुख्य व्यवसाय आहे. काँग्रेसने 18 वर्षांनंतर या ठिकाणी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत विक्रम यांनी भाजपाचे उमेदवार अनंत धुर्वे यांचा 3786 मतांनी पराभव केला आहे.
विक्रम आहाके यांनी "हा छिंदवाड्याच्या जनतेचा विजय आहे. कमलनाथजी आणि नकुलनाथजी यांच्या नावावर विश्वास ठेवण्यात आला आहे. मी छिंदवाड्याच्या संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी काँग्रेसचा 18 वर्षांचा वनवास संपवून विजय मिळवून दिला आहे" अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.