आता बस्स! अस्वस्थ, चिडलेल्या भारताला हवा आहे पर्याय! - राहुल गांधी
By aparna.velankar | Published: November 7, 2018 07:11 AM2018-11-07T07:11:21+5:302018-11-07T07:13:03+5:30
‘दीपोत्सव’ या लोकमत वृत्तसमूहाच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मराठीतल्या पहिल्याच मुलाखतीत राहुल गांधी यांनी देशातल्या वर्तमान भयग्रस्ततेने आपण अस्वस्थ असल्याचे सांगितले.
- अपर्णा वेलणकर
नवी दिल्ली - ‘सत्तास्थानी असलेल्या सद्गृहस्थांना फक्त ‘बोलण्या’चा सोस आहे. त्यांना ‘ऐकणे’ आवडत नाही. त्यांच्या मते सध्याच्या घडीला या देशात विचार करू शकणारी फक्त तीनच माणसे आहेत. पहिले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी. दुसरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि तिसरे अर्थातच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा. हे तिघे सर्वज्ञ. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी मिळून आधीच ठरविलेले आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या दिशेनेच मान खाली घालून निमूट चालणारा आज्ञाधारक देश त्यांना हवा आहे, ही मनमानी किती काळ चालेल?’ - असा स्पष्ट सवाल करून कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशात पेरला गेलेला आशावाद विरला असून, विचारी नागरिकांमधली अस्वस्थता भयावह रूप धारण करू शकेल, असा इशारा दिला आहे.
‘दीपोत्सव’ या लोकमत वृत्तसमूहाच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मराठीतल्या पहिल्याच मुलाखतीत राहुल गांधी यांनी देशातल्या वर्तमान भयग्रस्ततेने आपण अस्वस्थ असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर ‘मी काय म्हणतो’ ते देशाला सतत ऐकवत राहण्याऐवजी ‘देशाचे काय म्हणणे आहे’ ते ऐकणारा पर्याय आता हवा आहे आणि देशातला बंद पडलेला संवाद पुन्हा सुरू करणारा ‘पर्याय’ होण्याला आपण तयार आहोत, असेही ते म्हणाले.
‘शीर्षस्थानी एका व्यक्तीला नेमणे, नंतर अन्य सर्वांनी मतभेद नामक गोष्टच रद्दबातल ठरवून शिस्तबद्ध ऐक्याचे चित्र उभे करणे!’ - ही रा.स्व. संघाची नेतृत्व-नीती मगरुरीवर बेतलेली आहे आणि भारतासारख्या बहुआयामी देशाला ही रीत कदापि मान्य होणारी नाही, याचा अनुभव आपण आता घेतो आहोत, असे स्पष्ट करताना राहुल गांधी यांनी भारतीय नेतृत्वाच्या संकल्पना पाश्चात्त्यांपेक्षा वेगळ्या कशा आहेत, याचे तपशीलवार विवेचन केले. ‘मी’चा विलय करून देशातल्या सामान्यांचा आवाज होणारे नेतृत्व किती प्रभावी ठरू शकते हे महात्मा गांधीजींनी दाखवून दिले होते, तो मार्ग मला मोह घालतो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
वर्तमान राजकीय परिस्थितीचे अवलोकन, सामाजिक अस्वास्थ्याची कारणे आणि गेल्या काही वर्षांतल्या प्रवासामध्ये भेटलेल्या ‘भारता’ची बदलती रूपे याविषयी इतके तपशीलवार विवेचन करणारा मनमुक्त संवाद यापूर्वी राहुल गांधींनी क्वचितच कोण्या माध्यमाशी साधला असेल. ते नरेंद्र मोदींविषयी बोलले, ‘स्वातंत्र्य’ ही गोष्ट गृहीत धरण्याला सोकावलेल्या तरुण पिढीचे त्यांनी कान धरले, व्यक्तिगत वाटचालीतल्या ‘गुरुतुल्य’ अनुभवांचा तपशील सांगितला आणि समाजमाध्यमांमध्ये उडवली जाणारी उच्छृंखल ‘खिल्ली’ प्रत्यक्षात आपल्या मदतीलाच कशी येते, याचे रहस्यही त्यांनी या मुलाखतीत उघड केले.
‘देशासमोरच्या प्रत्येक प्रश्नाचे नामी उत्तर मला ठाऊक आहे, असा माझा भ्रम नाही. मी एक साधा माणूस आहे. सगळ्यांना असतो, तसा मला माझा स्वत:चा विचार आहे. अनुभवातून आकाराला आलेली मते आहेत. भूमिका आहेत - पण मला जे वाटते, तेच अंतिम सत्य अशा भ्रमात मी नाही. माझ्या मनाला दारे आहेत आणि ती चर्चेसाठी, वादविवादासाठी खुली आहेत.’ - अशी कबुली देत राहुल गांधी यांनी त्यांच्या भविष्यातल्या नेतृत्व-रीतीविषयीचे संकेतही दिले.
- व्यक्तिगत अनुभव, सुख-दु:खाचे प्रसंग, त्यातून घडत गेलेल्या जाणिवा, प्रवासातले अनुभव, आत्मचिंतनाचे मार्ग आणि ‘भारत’ नामक एका विलक्षण देशाविषयीची कृतज्ञता अशा अनेकानेक विषयांना स्पर्श करणारी ही मुलाखत लोकमत वृत्तसमूहातर्फे प्रकाशित झालेल्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात वाचता येईल. या मुलाखतीचा हिंदी अनुवाद लोकमत समूहाच्या ‘दीपभव’ या दिवाळी वार्षिक अंकातही प्रसिद्ध झाला आहे.
अंकाच्या प्रती नजीकच्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे उपलब्ध असून, राहुल गांधी यांच्याबरोबरच बेगम फरीदा खानम, दीपिका पदुकोण, सोनम वांगचुक, मन्सूर खान, अफगाणिस्तानमध्ये संगीताचे सूर परत आणण्यासाठी धडपडणाऱ्या ‘जोहरा’ गर्ल्स यांच्या समक्ष भेटी आणि वर्तमानाचा धांडोळा घेणारे अनेक रोचक रिपोर्ताज हे यावर्षीच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
अधिक माहिती आणि
आॅनलाइन खरेदीसाठी
ीिीस्रङ्म३२ं५.’ङ्म‘ें३.ूङ्मे
नफरत और प्यार
समाजमाध्यमांवरच्या
सार्वजनिक खिल्लीने मला
लज्जित केले नाही;
उलट आत्मचिंतनाला प्रवृत्त केले.
मी गप्प राहणे पसंत केले; कारण
विखारी द्वेषाचा प्रभावी सामना
केवळ मौनानेच होऊ शकतो,
हे मला माहिती आहे.
वो मुझे नफरत का तोहफा दे रहे है,
मै उसे प्यारमे बदल रहा हूं... एवढेच !
कोंबडीच्या अंड्यांची वाटणी
रा.स्व. संघ आणि भाजपासाठी देश हे जणू एक ‘प्रॉडक्ट’ आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडी. या देशाचे नेतृत्व करणे म्हणजे या कोंबडीच्या अंड्यांची वाटणी तेवढी करणे आणि ती अपेक्षित लोकांच्या पदरात पडतील असे पाहणे.
म्हणून तर या देशातले मोजके भांडवलदार खुशीत आहेत. त्यांना अंडी मिळण्याशी मतलब आहे;
ती कोणाच्या माना पिरगाळून मिळाली, याची चौकशी ते तरी कशाला करतील, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.