'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:16 AM2019-06-24T10:16:19+5:302019-06-24T10:16:57+5:30
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. यावर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस अध्यक्षपदी कोणीही विराजमान होऊ शकतं परंतु, काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाने सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे. गांधी कुटुंबियांव्यतिरिक्त कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र पक्ष संघटनेत गांधी कुटुंबाने सक्रिय राहणे गरजेचे आहे. भाजपचा उद्देश गांधीमुक्त काँग्रेस असाच आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा केली आहे. मात्र राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, असं सांगताना अय्यर म्हणाले की, राहुल यांच्या निर्णयाचा देखील सन्मान व्हायला हवा.
काँग्रेस पक्ष नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय जिवंत राहू शकतो. मात्र नेहरू-गांधी कुटुंबातील व्यक्तीने सक्रीय राहावे, ज्यामुळे संकटाच्या काळी पक्षाला मदत होईल, असंही अय्यर यांच म्हणणे आहे. राहुल यांनी पक्षाला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. मात्र या मुद्दावर काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती असून पक्ष अजुनही राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी आग्रही आहे.