"काँग्रेसला कुणीही माय-बाप उरला नाही, ती देशाला भविष्य देऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 09:57 PM2020-11-20T21:57:28+5:302020-11-20T22:05:22+5:30

कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. कारण...

Arvind kejriwal said congress is not the future of the country | "काँग्रेसला कुणीही माय-बाप उरला नाही, ती देशाला भविष्य देऊ शकत नाही"

"काँग्रेसला कुणीही माय-बाप उरला नाही, ती देशाला भविष्य देऊ शकत नाही"

Next
ठळक मुद्देकाँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत.नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या घसरगुंडीनंतर काँग्रेसला सातत्याने आरोपांचा सामना करावा लागत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी घरचा आहेर दिल्यानंतर, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेस देशाला भविष्य देऊ शकत नाही. काँग्रेसचा कुणीही माय-बाप उरला नाही. जनतेने काँग्रेस अथवा भाजप कुणालाही मत दिले, तरी सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर वेगळे होऊन भाजपमध्ये जातात," असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिन्दुस्तान टाइम्स लिडरशिप समिट 2020मध्ये बोलत होते, ''कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर भाजपमध्ये जातात. काँग्रेस देशाचे भविष्य होऊ शकत नाही,'' असे केजरीवाल म्हणाले. 

देश पातळीवरील राजकारणात आम आदमी पार्टीच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता केजरीवाल म्हणाले, ''आमची भूमिका कशी असेल, हे वेळच ठरवेल. आम आदमी पार्टी एक छोटा पक्ष आहे. संघटनात्मक दृष्ट्या आमचा फारसा विस्तार नाही. मात्र, दिल्लीतील कामांमुळे संपूर्ण देश आम आदमी पार्टीकडे आदराने पाहतो. मला आशा आहे, की देशातील लोक नक्कीच पर्याय देतील.''

केजरीवालांच्या या वक्तव्यापूर्वी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात आदी. ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि पोट निवडणुकीत काँग्रेसची पार घसरगुंडी उडाली. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. 
 

Web Title: Arvind kejriwal said congress is not the future of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.