माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या CEO ना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 01:21 PM2022-01-27T13:21:16+5:302022-01-27T13:22:35+5:30
सन 2021 च्या अगोदर पहिल्या 7 महिन्यांत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर जवळपास 7 लाख फॉलोअर्स वाढले आहेत.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना एक तक्रारी पत्र लिहिले होते. भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यात ट्विटरचा अज्ञानातून सहभाग आहे. एका सरकारी अभियानाबद्दल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न या प्लॅटफॉर्मवरुन झाल्याचे राहुल यांनी तक्रारीत म्हटले आहे. राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या डेटा विश्लेषणासंदर्भात माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी मंत्री शशी थरुर यांच्या ट्विटर अकाऊंटसोबतची तुलनात्मक माहिती शेअर केली आहे.
सन 2021 च्या अगोदर पहिल्या 7 महिन्यांत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर जवळपास 7 लाख फॉलोअर्स वाढले आहेत. मात्र, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 8 दिवसांच्या निलंबनानंतर पुढील काही महिने ही वाढ थांबल्याचं दिसून येत आहे. त्याचदरम्यान इतर नेत्यांच्या फॉलोअर्संची होणारी वाढ कायम आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटरला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रत्येक महिन्यात 2.3 लाख फॉलोअर्स जोडले
माझ्या ट्विटर अकाऊंटशी दरमहा सरासरी 2.3 लाख पेक्षाही जास्त फॉलोअर्स जोडले जात होते. हीच संख्या एखाद्या महिन्यात 6.5 लाखांपर्यंतही पोहोचली आहे. दरम्यान, ऑगस्ट 2021 नंतर त्यांच्या नवीन जोडण्यात येणाऱ्या फॉलोअर्सच्या संख्येत घट झाली आहे. त्यानुसार, ही फॉलोअर्सची संख्या 2500 वर येऊन पोहोचल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यामुळेच, माझ्या 1.95 कोटी फॉलोअर्संच्या संख्येत वाढ होत नाही, असेही राहुल गांधींनी म्हटले.
दिल्लीतील मुलीवर झालेल्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचा मुद्दा मी उचलून धरला होता. शेतकरी आंदोनलाशीही जोडलो गेलो, मानवाधिकाराच्या मुद्द्यावरुनही सरकारला प्रश्न विचारले. माझा एक व्हिडिओही ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर झाला, ज्यामध्ये 3 कृषी कायदे मागे घेतले जातील, असे मी म्हणालो होतो.
ट्विटरचे उत्तर
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वतीने राहुल गांधींच्या आरोपासंदर्भाती पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ट्विटरच्या एका प्रवक्त्याने मत व्यक्त करण्यास नकार दिला. मात्र, ट्विटरवर फॉलोअर्संची संख्या कमी-जास्त करण्यास किंवा स्मॅममध्ये शून्य टक्के एवढी शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले.