आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले शेतकऱ्यांना एमएसपीसह कर्जमाफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:25 PM2024-05-20T13:25:15+5:302024-05-20T13:25:35+5:30
प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.
प्रयागराज : आमचे सरकार येताच सर्व गरिबांची यादी तयार होईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यांत आम्ही महिन्याला ८५०० रुपये टाकू. आम्ही शेतकऱ्यांना धान्य, बटाटा, ऊस आणि कापसासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार आहोत. आम्ही त्यांचे कर्जही माफ करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे म्हटले.
प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. ते म्हणाले, ही लढाई राज्यघटनेच्या रक्षणाची आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. कोणतीही शक्ती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या राज्यघटनेला मूठमाती देऊ शकत नाही. ही जनतेची राज्यघटना आहे.
बेरोजगार युवकांना देणार १ लाख रुपये, मनरेगाची मजुरी करणार दुप्पट
आम्ही बेरोजगार युवकांना दरवर्षी एक लाख रुपये देणार आहोत. अग्निवीर योजना आम्ही कचराकुंडीत फेकू. मनरेगावर काम करणाऱ्यांची मजुरी आणि आशा कार्यकर्त्यांचे मानधन आम्ही दुप्पट करणार आहोत, असेही ते म्हणाले.
हमीभाव देऊ : अखिलेश यादव
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सभेला संबोधित केले. आतापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. केंद्रातील सरकारच्या काळात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी काय काय नाही केले गेले. आमचे सरकार येताच शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळेल. ही निवडणूक सामान्य निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे.
एका बाजूला राज्यघटना गुंडाळू पाहणारे ते आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. भाजपवाल्यांनी सर्व प्रश्नपत्रिका फोडल्या आणि सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या. त्यांनी तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. आम्ही तुम्हाला नोकरीची हमी देतो. आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना गुंडाळली जाईल, असेही अखिलेश म्हणाले.