Asaduddin Owaisi : "अमेठीची निवडणूक हरण्यासाठी भाजपाकडून पैसे घेतलेले का?", ओवेसींचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:04 AM2023-11-04T11:04:09+5:302023-11-04T11:13:42+5:30
Asaduddin Owaisi and Rahul Gandhi : असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एआयएमआयएम भाजपाकडून पैसे घेतं आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसविरोधात उमेदवार उभे करतं असं राहुल यांनी म्हटलं होतं. यावर आता ओवेसींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आपल्या धार्मिक अस्मितेबद्दल द्वेष असल्याने राहुल गांधी आपल्यावर असे आरोप करतात, असा गंभीर आरोपही ओवेसी यांनी केला.
वृत्तसंस्थेनुसार, गुरुवारी रात्री संगारेड्डीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी असा दावा केला की राहुल गांधी तेच बोलतात जे कोणीतरी त्यांना लिखित स्वरूपात दिलं आहे. ओवेसी यांनी गांधींना विचारलं की अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरण्यासाठी किती पैसे घेतले. तुम्ही (राहुल) 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक हरण्यासाठी भाजपाकडून पैसे घेतले होते का? असा खोचक सवाल विचारला आहे.
ओवेसी म्हणाले की, "राहुल गांधी, तुम्ही हे आरोप करता कारण माझे नाव असदुद्दीन आहे. कारण, माझ्या चेहऱ्यावर दाढी आहे आणि मी टोपी घालतो, म्हणून तुम्ही माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करता. हा तुमचा या नावाविरुद्धचा द्वेष आहे. दाढी आणि टोपी घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करता. त्यामुळे तुम्ही आरोप करता."
तेलंगणातील निवडणूक रॅलीदरम्यान राहुल गांधींनी बुधवारी AIMIM ला लक्ष्य करताना आरोप केला होता की, असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष भाजपाकडून पैसे घेतो आणि जिथे काँग्रेस भाजपाशी लढते तिथे उमेदवार उभे करतो. आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, त्रिपुरा, जिथे जिथे जिथे काँग्रेस पक्ष भाजपासोबत लढतो तिथे एमआयएम पक्ष भाजपाकडून पैसे घेऊन तिथे उमेदवार उभे करतो, असा दावा त्यांनी केला होता.