Assam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:19 AM2021-07-27T10:19:29+5:302021-07-27T10:22:29+5:30
सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Assam-Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah)
नवी दिल्ली - इशान्येकडील आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सीमावादावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. ही घटना म्हणजे अमित शाह यांचे अपयश असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यामुळेच लोकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला, असेही ते म्हणाले. याच वेळी, त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली. (Assam Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah and gives condolences to the families of those who have been killed)
सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती मी आपली संवेदना व्यक्त करतो. याच बरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृह मंत्र्याचे अपयश समोर आले आहे. ते देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे." राहुल यांनी आपल्या या ट्विटसोबत घटनेचा व्हिडिओही जोडला आहे.
Heartfelt condolences to the families of those who’ve been killed. I hope the injured recover soon.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2021
HM has failed the country yet again by sowing hatred and distrust into the lives of people. India is now reaping its dreadful consequences. #AssamMizoramBorderpic.twitter.com/HJ3n2LHrG8
काय म्हणतायत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री -
आसाम-मिझोरम सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरले आहे. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांचे पोलीस शांतता राखतील असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांनी ट्विटरवरून दिली. तर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामच्या पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधूर सोडल्याचा आरोप केला आहे.