Assembly Election: कोण मुख्यमंत्री? राजस्थानात काँग्रेस-भाजपसमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:19 AM2023-11-26T06:19:58+5:302023-11-26T06:22:39+5:30
Assembly Election: राजस्थानमध्ये काँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली - राजस्थानमध्येकाँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे. तिन्ही राज्यांत भाजपने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही.
काँग्रेसनेही मध्य प्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे. परंतु, छत्तीसगड व राजस्थानमध्ये कोणत्याही नेत्यांबाबत अशी घोषणा केलेली नाही.
राजस्थानात द्विधा मन:स्थिती
दोन्ही पक्षांना सर्वांत जास्त आव्हानांची स्थिती यावेळी राजस्थानमध्ये असणार आहे. काँग्रेसचेच सरकार पुन्हा सत्तेत आले तर पुन्हा अशोक गेहलोत मुख्यमंत्री होतात किंवा सचिन पायलट यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतात, हे पाहावे लागेल. सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण, याबाबत राजस्थान भाजपमध्ये द्विधा स्थिती आहे. वसुंधरा राजे यांना भाजपचे नेतृत्व मुख्यमंत्री करू इच्छित नाही. उर्वरित नेत्यांमध्ये गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, ओम बिरला याबरोबरच आणखी एक नाव समोर येत आहे. आणि ते म्हणजे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. ते मूळचे राजस्थानचे आहेत.
छत्तीसगडमध्ये रमण सिंह हाच पर्याय
- छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भलेही भूपेश बघेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर आणले नसले तरी महादेव ॲपमध्ये त्यांचे नाव आलेले आहे. परंतु, आमदारांचे पाठबळ बघेल यांच्या पाठीशी जास्त आहे.
- अशा स्थितीत टी. एस. सिंहदेव शर्यतीत खूपच मागे आहेत. भाजप छत्तीसगडमध्ये नेताविहीन आहे. रमण सिंह नसतील तर कोणताही पर्याय दिसत नाही.
मध्य प्रदेशात चित्र स्पष्ट
मध्य प्रदेशात चित्र बरेचसे स्पष्ट झालेले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास कमलनाथ मुख्यमंत्री होतील आणि भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदासाठी सर्वांत मजबूत दावेदार केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल असू शकतील. ते ओबीसीतून येतात. शिवराज सिंह चौहान यांना दोन्ही स्थितीत यावेळी केंद्रात जावे लागेल, अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमरही मजबूत दावेदार होते. परंतु, त्यांच्या पुत्राबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्यांचा दावा कमजोर झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दावेदारांमध्ये कैलाश विजयवर्गीय, नरोत्तम मिश्रा हे ओबीसी नसल्यामुळे मागे पडले आहेत.
राजस्थानमध्ये ६८ टक्के मतदान
जयपूर - राजस्थानमध्ये २०० सदस्यांच्या राज्य विधानसभेच्या १९९ जागांसाठी ६८ टक्के मतदान झाले आहे. राज्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. काही भागांत वेगवेगळ्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वाद झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता मतदान समाप्त झाले. सिरोही जिल्ह्यातील चारवली गावाने मतदानावर बहिष्कार टाकला.
राज्यात एकूण ३६,१०१ ठिकाणी ५० हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. पाच कोटी २६ लाखांहून अधिक मतदार आहेत. एकूण १,८६२ उमेदवार रिंगणात आहेत. ७०,००० पोलिस कर्मचाऱ्यांसह १.७० लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
काँग्रेसविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. पक्ष राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल, असे दिसते काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल.
- अशोक गेहलोत, मुख्यमंत्री
प्रत्यक्षात अंडरकरंट आहे; पण तो भाजपच्या बाजूने आहे. ३ डिसेंबरला भाजपचे कमळ फुलणार आहे.
- वसुंधरा राजे, भाजप ज्येष्ठ नेत्या