पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 10:34 AM2019-03-22T10:34:46+5:302019-03-22T10:44:18+5:30

पित्रोडांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता

Attacks like Pulwama happen all the time wrong to attack Pakistan says congress leader Sam Pitroda | पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

googlenewsNext

नवी दिल्ली: काही जण येऊन हल्ले करतात, त्यासाठी संपूर्ण देशाला दोषी धरणार का?, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना पित्रोडांनी हा सवाल उपस्थित केला. यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकत होतो. मात्र असं करणं योग्य नाही. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राइकवर भाष्य केलं.






पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राइक यावर सॅम पित्रोडांनी भाष्य केलं. 'मला हल्ल्यांविषयी फारसं माहीत नाही. पण असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकलो असतो. मात्र ते योग्य नाही. तुम्ही असं वागू शकत नाही, असं मला वाटतं,' अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी पुलवामा हल्ला आणि हवाई दलाच्या हल्ल्यावर भाष्य केलं. काँग्रेसचे परदेश प्रमुख असलेले पित्रोडा राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.








पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी 26/11 हल्ल्यावरही भाष्य केलं. 'आठजण आले आणि त्यांनी काहीतरी केलं. त्यासाठी तुम्ही देशाला (पाकिस्तानला) जबाबदार धरू शकत नाही. त्या देशातले काहीजण येऊन हल्ला करतात, त्यासाठी त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिकाला दोषी धरता येणार नाही. यावर माझा विश्वास नाही,' असं पित्रोडा म्हणाले. हवाई दलाच्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती सरकारनं द्यायला हवी, असं पित्रोडा म्हणाले. 'आपण नेमका कुठे हल्ला केला, हे समजायला हवं. आपण खरंच 300 जणांचा खात्मा केला का?,' असा सवाल त्यांनी विचारला. 'तुम्ही 300 जण मारले असतील, तर आपल्याला ते कळायला हवं. सर्व भारतीयांना याची माहिती द्यायला हवी. हवाई दलाच्या हल्ल्याच कोणीच मारलं गेलं नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमं करतात. त्याबद्दल एक भारतीय म्हणून मला वाईट वाटतं,' असंदेखील ते पुढे म्हणाले. 

Web Title: Attacks like Pulwama happen all the time wrong to attack Pakistan says congress leader Sam Pitroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.