लक्ष २०२४! भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस खा. राहुल गांधींचा काय आहे नवा प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:59 PM2023-01-31T15:59:50+5:302023-01-31T16:00:19+5:30
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये संपली. २०१४ ला काँग्रेस देशातील सत्तेतून बाहेर गेली. निसटता जनाधार आणि कमकुवत होत असलेल्या पक्षसंघटनेला पुन्हा नवजीवन देण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमीहून जास्त पदयात्रा काढली. यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक असंतुलनसारखे मुद्दे पुढे आणले. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता राहुल गांधींचा पुढचा प्लॅन काय असा प्रश्न उभा राहिला.
५ महिने चाललेल्या भारत जोडो यात्रेत ही अराजकीय होती असं म्हटलं जात होते. परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्याने काढलेली यात्रा नेहमी राजकारणाशी जोडलेली असते. त्यामुळे राहुल गांधींच्या या यात्रेचा काँग्रेसच्या राजकारणाशी संबंध आहेच. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसनं स्वत:ला सक्रीय ठेवण्यासाठी ग्राऊंडवर उतरून वातावरण निर्मिती करण्याचा खास प्लॅन बनवला आहे.
काँग्रेसचं हाथ से हाथ जोडो अभियान
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसनं हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले आहे. हे अभियान ३ महिने चालेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील अनुभव असलेले पत्र घेऊन काँग्रेस नेते-कार्यकर्ते गावोगावी, घरोघरी जात लोकांना भेटतील. त्याअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संमेलन आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
राहुल गांधी पुन्हा पदयात्रा काढणार
हाथ से हाथ जोडो अभियानानंतर काँग्रेस भारत जोडो यात्रा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. काँग्रेस महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल. या पदयात्रेचा फायनल रोडमॅप बनला नाही. परंतु दुसरा टप्पा नक्कीच निघेल ज्यात राहुल गांधी सहभागी होतील.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दुसऱ्या टप्प्यात पदयात्रा तेव्हा निघेल जेव्हा देशातील महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान , कर्नाटकसारख्या राज्यात निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२३ हे पूर्ण वर्ष काँग्रेस एक्टिव्ह राहण्याचा प्लॅन बनवला आहे. काँग्रेस छत्तीसगडच्या रायपूर इथं २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन आयोजित करेल. ज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संघटनात्मक निर्णय घेतील.