राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

By यदू जोशी | Published: December 12, 2018 02:54 PM2018-12-12T14:54:04+5:302018-12-12T14:57:33+5:30

कितीही चढउतार आले तरीही त्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेस हेच कुटुंब मानले. नागपूर सोडून ते जवळपास दिल्लीतच राहतात.

Avinash Pande the architect of Congress victory in Rajasthan Assembly Election 2018 | राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

Next
ठळक मुद्देअविनाथ पांडे हे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत आणि राजस्थानचे प्रभारी.राजस्थानच्या प्रभारी पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली त्यावेळी तेथील काँग्रेस पक्षासमोर अनेक आव्हाने होती.ते सोळा सोळा तास काम करतात. प्रत्येक गोष्टीचे मायक्रोप्लॅनिंग हे त्यांचे वैशिष्ट्य.

- यदु जोशी 

मुंबई -  राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट यांच्याकडे बघितले जात आहे. मात्र गेली दीड-दोन वर्षे काँग्रेसच्या विजयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या एका नागपूरकर नेत्याचे कौतुक केले नाही तर तो त्याच्यावरील मोठा अन्याय ठरेल.

हा नेता म्हणजे अविनाश पांडे. ते अविनाशभैया म्हणून सुपरिचित आहेत. कितीही चढउतार आले तरीही त्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेस हेच कुटुंब मानले. नागपूर सोडून ते जवळपास दिल्लीतच राहतात. ते अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत आणि राजस्थानचे प्रभारी.
 
अविनाशभैयांची राजकीय कारकीर्द नागपुरात सुरू झाली. विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीपासून ते सक्रिय होते  एनएसयूआय, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. एकदा आमदारकी आणि एकदा खासदारकी एवढीच त्यांची संसदीय कारकीर्द. पाच-पाच वेळा पक्षाने खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद दिले तरीही अन्यायाची ओरड करणारे आणि नंतर पक्षाशी गद्दारी करणारे अनेक नेते आहेत.  अविनाशभैय्यांनी पक्षाविषयी कोणतीही तक्रार कधीही न करता पक्षनिष्ठा कायम ठेवली. ते राजीवजींचे विश्वासू होते. सोनियाजींचाही त्यांच्यावर तेवढाच विश्वास आहे आणि आज राहुल गांधी यांचेही ते तेवढेच विश्वासू आहेत. त्यांच्या पक्षनिष्ठेची ही पावतीच म्हटली पाहिजे.

राजस्थानच्या प्रभारी पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली त्यावेळी तेथील काँग्रेस पक्षासमोर अनेक आव्हाने होती. अविनाशभैयांनी मग एकेका आव्हानाचा सामना करण्याची रणनीती तयार केली. पक्षातील मतभेद संपवणे हे सर्वात मोठे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पेलले. पक्षसंघटनेला मरगळ आलेली होती. ती झटकून नवचैतन्य आणण्यासाठी आवश्यक सर्व मोर्चेबांधणी केली. पक्षातील सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी यांना प्रोत्साहन दिले,सर्व गट एकत्र आणले. पक्षातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करताना स्वतःची जबाबदारी मात्र त्यांनी कधीही झटकली नाही. पक्ष कार्यालयात बसले की ते सोळा सोळा तास काम करतात. प्रत्येक गोष्टीचे मायक्रोप्लॅनिंग हे त्यांचे वैशिष्ट्य. राज्यातील लहानमोठ्या नेत्यांशी संपर्क आणि त्याचवेळी पक्षश्रेष्ठींशी समन्वय राखण्याचे अतिशय चांगले काम त्यांनी केले.
अविनाशभैयांच्या जवळचे विदर्भातील पंचवीस-तीस कार्यकर्ते राजस्थानमध्ये प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी गेले होते. त्यातील एकाने व्यक्त केलेली खंत फारच बोलकी होती. तो म्हणाला," आपण आपल्या माणसाची कधी किंमतच करत नाही. अविनाशभैया पक्षासाठी अहोरात्र झटतात पण त्यांना महाराष्ट्रात पक्षाकडून किती मानसन्मान मिळतो? पण राजस्थानमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्या बरोबरीने प्रत्येक पोस्टरवर अविनाशभैयाचे फोटो होते हे सांगताना त्या कार्यकर्त्याचा ऊर भरून आला.

स्वतःशीच स्पर्धा करणारा हा नेता आहे. स्वतः पक्षाला दरदिवशी काय अधिक देऊ शकतो, पक्षासाठी काय चांगले करू शकतो एवढाच विचार ते करतात. एखाद्या श्रेयनामावलीत आपले नाव येते वा येत नाही याची तमा न बाळगता ते पक्ष आणि नेतृत्वावरील अविचल निष्ठा बाळगत चालत राहतात. राजस्थानमधील यशाने हुरळून जायला त्यांना वेळ कुठे आहे?

Web Title: Avinash Pande the architect of Congress victory in Rajasthan Assembly Election 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.