राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:34 AM2023-03-29T06:34:26+5:302023-03-29T06:34:33+5:30
दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव टाळून यापुढे इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भर देणार असून दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन शिवसेनेच्या राजकारणासाठी सावरकर किती महत्त्वाचे आहेत, तसेच सद्य:स्थितीत सावरकरांचा मुद्दा सोडून आजचे मुद्दे घेऊन मोदी सरकारशी लढावे लागणार आहे, हे निदर्शनास आणून दिले.
शिवसेनेच्या या मागणीशी राहुल गांधी सहमत दिसले आणि महाराष्ट्र आणि संसदेची लढाई एकत्र लढायची असेल तर दोन्ही पक्षांना एकमेकांच्या विचारसरणीचा आदर करावा लागेल, अशी सहमती दोन्ही पक्षांमध्ये झाली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी सावरकर’ असे नवे पोस्टर आणले आणि ते आपल्या सोशल मीडियावरही ठेवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘आम्ही सारे सावरकर’ असे पोस्टर सोशल मीडियावर झळकवले आहे.
संभ्रमित होऊ नका, मोदींशी लढायचे की सावरकरांशी?
‘तुम्हाला पंतप्रधान मोदींशी लढायचे आहे, की सावरकरांशी ते ठरवा, आणि संभ्रमित होऊ नका,’ असा सबुरीचा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मनात खदखदत असलेला सावरकर विरोध शमविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राहुल गांधींनी सावरकरांना लक्ष्य करण्याचे टाळावे, असे आवाहन शरद पवार तसेच डाव्या आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या रात्रीभोजमध्ये केले. या भोजनावर ठाकरे गटाच्या खासदारांनी बहिष्कार टाकला होता. सावरकरांवर टीका करणे बरोबर नाही. हा प्रत्येकाच्या विचारधारेचा विषय आहे. त्यातून काही साध्य होणार नाही, असा सल्ला माकपचे विनय विश्वम आणि अन्य नेत्यांनी दिला.
लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यावर अविश्वास?
विरोधी पक्षांशी झालेल्या बैठकीत अनेक प्रकारचे प्रस्ताव दिले जातात. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला पाहिजे, असा प्रस्ताव काँग्रेसचे लोकसभा सदस्य मनीष तिवारी यांनी दिला आहे. हा प्रस्ताव ठेवला तेव्हा केवळ काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर विरोधी पक्षांशी कोणतीही चर्चा झाली नाही. बुधवारी सकाळी विरोधकांच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाकरे आमच्यासोबत : जयराम रमेश
ठाकरे गटाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांची भेट घेऊन सावरकरांच्या मुद्द्यावर चर्चा केली. प्रत्येक पक्षाची आपली स्वतंत्र विचारधारा आहे. आम्ही सावरकरांना मानतो आणि मानणार. सावरकरांवरील टीकेचा महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना त्रास होईल याची जाणीव राऊत यांनी करून दिली. त्यावर सहमत होत राहुल गांधी यांनी पुढे टीका न करण्याचे आश्वासन दिले. हा विषय आता संपलेला आहे, असे राऊत म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षांच्या बैठकीला १८ विरोधी पक्षांनी हजेरी लावली होती. मात्र, काँग्रेसचे प्रसार माध्यम प्रभारी जयराम रमेश आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आता १९ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, जे गौतम अदानींच्या मुद्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत लढणार आहेत. शिवसेनेचा ठाकरे गट आमच्यासोबत आहे. जी काही छोटी समस्या होती, त्यावर उपाय सापडला आहे.