उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 09:17 PM2019-03-02T21:17:17+5:302019-03-02T21:20:17+5:30
सपाचे माजी खासदार राकेश सचान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
लखनऊ: उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. डिसेंबरमध्ये भाजपामधून बाहेर पडलेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप करत फुले यांनी दोनच महिन्यांपूर्वी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बहराईचच्या खासदार असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी डिसेंबरमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीदेखील काँग्रेसचा हात धरला. लोकसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे राहिले असताना आजी-माजी खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले. राकेश सचान समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते फतेहपूरचे माजी खासदार आहेत.
Delhi: Bahraich MP Savitri Bai Phule (former BJP leader) and former Fatehpur MP Rakesh Sachan (former SP leader) join Congress in presence of Party President Rahul Gandhi, General Secretary for UP east Priyanka Gandhi Vadra and General Secretary for UP west Jyotiraditya Scindia. pic.twitter.com/efy0BybpSE
— ANI (@ANI) March 2, 2019
राम मंदिर आणि दलितांवरील हल्ल्यांवरुन सावित्रीबाई फुलेंनी भाजपाला अनेकदा लक्ष्य केलं होतं. भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्येत 1992 सारखी परिस्थिती निर्माण करत आहे. समाजात फूट पाडून तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. त्यामुळेच पक्ष सोडत असल्याचं फुले म्हणाल्या होत्या. भाजपा दलितविरोधी असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. यापुढे भाजपाचा आणि माझा कोणताही संबंध नाही. जिवंत असेपर्यंत भाजपात परत जाणार नाही, असंदेखील फुलेंनी पक्ष सोडताना म्हटलं होतं. 2014 मध्ये बहराईचमधून खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी 2012 मध्ये बहराईचच्या बेल्हामधून विधानसभा निवडणूक लढवली होती.