राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवालांविरोधात बँकेने केला अब्रुनुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:44 AM2018-08-28T08:44:01+5:302018-08-28T09:27:26+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात बँकेने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
अहमदाबाद - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 2016 साली झालेल्या नोटाबंदीच्या काळात पहिल्या पाच दिवसांमध्ये 750 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या घोटाळ्यात या बँकेचा सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.
याबाबत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने अध्यक्ष अजय पटेल यांनी याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी आणि सुरजेवाला यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केले, असा दावा अजय पटेल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर 17 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबईतील एका आरटीआय कार्यकर्त्याने दाखल केलेल्या आरटीआयमध्ये नाबार्डने बँकेतील उलाढालीबाबत माहिती दिल्यानंतर राहुल गांधी आणि सुरजेवाला यांनी हे आरोप केले होते. काँग्रेसच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी केलेले वक्तव्य खोटे आहे. कारण एवढ्या रकमेची अदलाबदल बँकेत झालीच नाही, असे अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे वकील एस. व्ही. राजू यांनी न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर अहमदाबाद बँकेतील घोटाळ्यावरून आरोप केला होता. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले अमित शाह यांचे अभिनंदन. नोटाबंदीच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यासाठी तुमच्या बँकेला पहिले पारितोषिक मिळाले आहे. नोटाबंदीमुळे लाखो भारतीयांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र तुम्ही मिळवलेल्या या यशाबद्दल तुम्हाला सलाम, असे ट्विट राहुल गांधी यांनी 22 जून रोजी केले आहे.