ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढल्यास बँक जबाबदार - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:31 PM2019-02-07T12:31:11+5:302019-02-07T12:38:37+5:30
केरळ हायकोर्टाने ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील असे म्हटले आहे.
कोची - केरळ हायकोर्टाने ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील असे म्हटले आहे. न्या. पी. बी. सुरेश कुमार यांनी ग्राहकाने एसएमएस अलर्टचे उत्तर दिले नाही तरी त्याच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढले असल्यास बँक जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे. तसेच बँक या जबाबदारीपासून पळू शकत नाही असे ही हायकोर्टाने म्हटले आहे.
परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढल्याने एका ग्राहकाचे 2.4 लाखांचे नुकसान झाले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाला त्याची भरपाई देण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले होते. मात्र या आदेशाला बँकेने हायकोर्टात आव्हान दिले होते. बँकेने यावर खात्यातून रक्कम काढल्याचा एसएमएस अलर्ट ग्राहकाला पाठवला होता. ग्राहकाने खाते ब्लॉक करण्यासंबंधी कळवायला हवे होते. मात्र, एसएमएस मिळाल्यानंतरही ग्राहकाने त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याच्या झालेल्या नुकसानीला आम्ही जबाबदार नाही असा युक्तीवाद केला होता.
ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी सावधानता बाळगणे हे बँकेचे कर्तव्य आहे. ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची जबाबदारी बँकेची आहे असेही हायकोर्टाने नमूद केले. ग्राहकाच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढल्यास बँक जबाबदार राहील. कारण त्यांनी हा गुन्हा रोखण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा तयार केली नाही, असेही कोर्टाने सांगितले आहे.