महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:26 AM2024-01-17T06:26:41+5:302024-01-17T06:43:46+5:30
बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो.
एर्नाकुलम : केरळउच्च न्यायालयाने सोमवारी नोकरदार महिलांची बदली करताना संस्थांना सहानुभूती दाखवण्यास सांगितले. नोकरदार महिला कुटुंबाची काळजी घेतात. त्या त्यांच्या मुलांची आणि वृद्ध पालकांची काळजी घेतात. नवीन ठिकाणी बदली झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो. त्यांच्या करिअरच्या प्रगतीतही अडथळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत नोकरी देणारी व्यक्ती किंवा संस्था महिलांप्रति संवेदनशील असायला हवी, असे कोर्टाने म्हटले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आपल्या बदली विरोधात दोन महिला डॉक्टरांनी केरळउच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांची एर्नाकुलममधील कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा निगम रुग्णालयातून कोल्लममधील कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा निगम रुग्णालयात बदली करण्यात आली.
या दोन्ही महिलांनी यापूर्वी त्यांच्या बदलीच्या आदेशाला न्यायाधिकरणात आव्हान दिले होते. मात्र, न्यायाधिकरणाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. दोन्ही महिलांनी सांगितले होते की, त्यांना त्यांची मुले आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी घ्यावी लागते.
बदलीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम
त्यांचे पती इतर ठिकाणी नोकरी करत असल्याने त्यांना त्यांच्या पत्नीसोबत राहणे शक्य नाही. बदलीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होईल, शैक्षणिक सत्राच्या मध्येच मुलांना प्रवेश मिळणे कठीण होईल, नोकरदार महिला त्यांच्या घरात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या बदलीचे आदेश काढताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले.
असा पडतोय भार...
या स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. तिला १७ आणि ६ वर्षांची दोन मुले आहेत. ज्यांना दमा आहे. मोठा मुलगा अकरावीचा विद्यार्थी आहे. आपल्या ८९ वर्षांच्या आईची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. दुसरी महिला डॉक्टर जनरल सर्जन आहे. तिला ७ वर्षांचे एक मूल असून, तिचा पती बंगळुरू येथे काम करतो. तिच्या आईला सतत चक्कर येते आणि तिला नेहमी काळजी घ्यावी लागते.