खासदारकी गेली तरी बेहत्तर, जेपीसीच्या मागणीवर ठाम; काँग्रेस व भाजपचा समझोता अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 10:08 AM2023-03-24T10:08:42+5:302023-03-24T10:08:59+5:30
अलीकडेच संसदेतील कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारने म्हटले होते की, काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडावी आणि राहुल गांधींच्या लंडनमधील विधानांबाबत माफीची मागणी आम्ही सोडून देऊ.
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली असली, तरी त्यांनी आपल्या निकटवर्तीय नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे की, ते कोणत्याही अटीवर गौतम अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी सोडणार नाहीत. आपली खासदारकी गेली तरी बेहत्तर, पण मागणी सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अलीकडेच संसदेतील कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारने म्हटले होते की, काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडावी आणि राहुल गांधींच्या लंडनमधील विधानांबाबत माफीची मागणी आम्ही सोडून देऊ. परंतु, राहुल गांधी यांना हे मान्य झाले नाही. ते म्हणाले की, मी काहीच चुकीचे केलेले नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी लोकसभेत बोलेन. आज कोर्टाच्या निकालानंतरही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते की, भाजपकडून पुन्हा जेपीसीची मागणी सोडण्याची ऑफर येऊ शकते.
‘लोकमत’च्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोर्टाबाहेर पडताच निकटवर्तीय सदस्यांना सांगितले की, लोकसभा सदस्यता गेली तरी चालेल. परंतु जेपीसीच्या मागणीबाबत कोणतीच तडजोड करणार नाही.