Bharat Bandh: ...अन् राहुल गांधींनी वापरला मोदींचा 'तो' डायलॉग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:46 PM2018-09-10T12:46:19+5:302018-09-10T12:51:49+5:30
पंतप्रधान मोदी अनेकदा वापरत असलेला डायलॉग राहुल गांधींनी भाषणात वापरला
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं पुकारलेल्या 'भारत बंद'ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात दिल्लीत मोर्चा काढला. राजघाटावरुन सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता रामलीला मैदानात झाली. याठिकाणी काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात धरणे आंदोलन केलं. कैलास मानसरोवर यात्रेवरुन परतलेल्या राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची भाषा केली होती. शेतकऱ्यांना समस्या संपवण्याचं आश्वासन दिलं होतं. लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मात्र त्यांनी जनतेची साफ निराशा केली, अशा शब्दांमध्ये राहुल गांधीनी मोदींवर शरसंधान साधलं. यावेळी राहुल यांनी मोदींचा डायलॉग वापरत त्यांच्यावरच टीका केली. 'गेल्या 70 वर्षांमध्ये जे झालं नाही, ते गेल्या 4 वर्षांमध्ये होतं, असं मोदी अनेकदा म्हणतात. मोदी अगदी योग्य बोलतात. आज देशाचा एक नागरिक दुसऱ्या व्यक्तीशी भांडत आहे. त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. कुठे वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींमध्ये संघर्ष सुरू आहे, तर कुठे दोन जातींमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी बरसले.
मोदी देशवासीयांच्या समस्यांवर मूग गिळून गप्प बसतात, असाही आरोप राहुल यांनी केला. इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. सध्या देशातील कोणालाही योग्य दिशा सापडत नाही. फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला. 'तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. चार वर्षांपूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 रुपयांचा झाला आहे. मात्र तरीही मोदी मूग गिळून गप्प आहेत. आज देशातील काही मोजक्याच लोकांना योग्य दिशा सापडली आहे. मोदींच्या उद्योगपती मित्रांचं सर्वकाही उत्तम सुरू आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.