...म्हणून भारत जोडो यात्रेत 'न्याय' शब्द जोडला; जयराम रमेश यांनी सांगितली इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:32 AM2024-01-05T08:32:12+5:302024-01-05T08:39:53+5:30
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल यांच्या 66 दिवसांच्या 6,700 किलोमीटरच्या यात्रेला 'भारत जोडो न्याय यात्रा' असं म्हटलं जात आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 2.0 ही 14 जानेवारी रोजी मणिपूरपासून सुरू होईल. अनेक महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूर आता सामान्य स्थितीची वाट पाहत आहे. राहुल यांच्या या 66 दिवसांच्या 6,700 किलोमीटरच्या यात्रेला 'भारत जोडो न्याय यात्रा' असं म्हटलं जात आहे. यापूर्वी या यात्रेला 'भारत न्याय यात्रा' असं नाव देण्यात आलं होतं. या यात्रेत 15 राज्ये आणि 100 हून अधिक लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.
महात्मा गांधींचं जन्मस्थान असलेल्या गुजरातमधील पोरबंदरमध्ये ही यात्रा संपणार आहे. ही यात्रा अरुणाचल प्रदेशातून सुरू करण्याचा काँग्रेसचा विचार होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या वर्षीच्या 'भारत जोडो यात्रे'मुळे निर्माण झालेला प्रभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी "जोडो" हा शब्द यामध्ये जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे."
"राहुल गांधींच्या दौऱ्याचा विचार न्याय असा आहे. भारतातील लोकांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणं हा त्या मागचा उद्देश आहे." कन्याकुमारी ते श्रीनगर या भारत जोडो यात्रेने खूप चांगल्या भावना निर्माण केल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. या भेटीमुळे राहुल गांधींकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलल्याचं काँग्रेस नेत्यांनी मान्य केलं आहे.
भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता इम्फाळ येथून सुरू होईल. मध्य भारतात पोहोचण्यापूर्वी ती मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालयमधून पुढे बंगालमध्ये जाईल. गेल्यावेळेप्रमाणे हा प्रवास पूर्णपणे पायी नसणार आहे. प्रवासाच्या काही भागांसाठी काँग्रेस बसचा वापर करेल असं जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं.
जयराम रमेश म्हणाले की, "आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, त्यांचे समर्थक, सामान्य जनता आणि स्वयंसेवी संस्थांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत." अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला निमंत्रित करणार का? असं विचारलं असता रमेश म्हणाले की, इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीचा भाग आहेत."