'सुरुवातीला भारत जोडो यात्रा अवघड वाटायची, पण एक शक्ती पाठीशी होती'- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:56 PM2022-10-15T18:56:43+5:302022-10-15T19:09:18+5:30
'आमची यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात आहे.'
Bharat Jodo Yatra:काँग्रेसच्या भारत जोडो (Congress Bharat Jodo Yatara) यात्रेचा आज 38वा दिवस आहे. या 38 दिवसांत कर्नाटकातील बेल्लारी येथे भारत जोडो यात्रेने एकूण 1,000 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जनतेला संबोधित केले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'सुरुवातीला ही पदयात्रा अवघड वाटत होती, पण नंतर काही एक शक्ती आम्हाला पुढे नेत असल्याचे दिसले. आमची ही यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विभाजन करणाऱ्या विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा म्हणजे, भारतावर झालेला हल्ला आहे. त्यांची ही देशभक्ती नाही, देशविरोधातील काम आहे.'
यात्रेत द्वेष आणि हिंसा आढळणार नाही
राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'आमच्या या प्रवासात तुम्हाला कुठेही द्वेष आणि हिंसा सापडणार नाही. ही विचारसरणी केवळ यात्रेची नसून ती कर्नाटक आणि भारताची विचारसरणी आहे. या लोकांना (भाजप) 24 तास अन् 50 वर्षे लागतील, हा डीएनए तुमच्याकडून काढता येणार नाही.'
पंतप्रधान मोदींमुळे रोजगार गेला
राहुल गांधी म्हणाले की, 'सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळण्याचा विश्वास नाही. आज भारतात गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नोकऱ्या कुठे गेल्या? नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोना या पंतप्रधानांच्या धोरणांमुळे साडेबारा कोटी तरुणांचा रोजगार गेला,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.