Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 04:42 PM2023-01-01T16:42:50+5:302023-01-01T16:43:59+5:30
Rahul Gandhi Security Breach: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने दुसऱ्यांना गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
Bharat Jodo Yatra Security Breach: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरुन नवीन राजकारण सुरू झाले आहे. यातच सीआरपीएफच्या दाव्यानंतर दोन दिवसांनी काँग्रेसने शनिवारी (31 डिसेंबर) पुन्हा भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. सुरक्षा व्यवस्थेबाबत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिले आहे. यापूर्वी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने म्हटले होते की राहुल गांधी यांनी अनेक प्रसंगी मार्गदर्शक तत्त्वांचे "उल्लंघन" केले होते.
काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सीआरपीएफकडून मिळालेल्या प्रतिसादाविरोधात आम्ही चिंता व्यक्त करत आहोत. हे अस्वीकार्य आहे, कारण यामुळे समस्या सुटत नाही तर ती मोठी होते. पहिल्या पत्रात काँग्रेसने यात्रेच्या दिल्ली टप्प्यात सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यानंतर सीआरपीएफने त्यावर प्रत्युत्तरही दिले.
काय म्हणाले सीआरपीएफ?
सीआरपीएफ राहुल गांधींना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवते. सुरक्षा एजन्सीने काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या आरोपांना उत्तर दिले होते की, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे मार्गदर्शक तत्त्वांनुसार केल्या गेल्या आहेत. यात्रे दरम्यान राहुल गांधींनी 113 वेळा नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती सीआरपीएफने दिली.
Our point-wise response to the letter written by DIG (VS) CRPF on the issue of the deliberate lapses in the security arrangements of #BharatJodoYatra in Delhi. @AmitShahOfficepic.twitter.com/GaUSmE21rN
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) December 31, 2022
काँग्रेसने पुन्हा पत्र लिहिले
सीआरपीएफच्या दाव्यानंतर आपल्या ताज्या पत्रात, काँग्रेसने पुन्हा एकदा सोहना, हरियाणातील घरफोडीचा मुद्दा उपस्थित केला आणि सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांमधील समन्वयाच्या अभावावरही भर दिला. मात्र, यापूर्वी शहर पोलिसांशी चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा यंत्रणेने दिले होते.
"अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले"
काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या नवीन पत्रात असे लिहिले आहे की, "अनेकदा अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले होते. त्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफिक पुरावे शेअर केले जाऊ शकतात." हरियाणा पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या कर्मचार्यांनी यात्रेत घुसखोरी केल्याचे पक्षाने म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, या विश्वासाने भारत जोडो यात्रेत आम्ही पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.