Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा भव्यदिव्य समारोप; काँग्रेसनं 24 समविचारी पक्षांना पाठवलं आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:46 PM2023-01-11T19:46:22+5:302023-01-11T19:47:05+5:30
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रेचा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये समारोप होत आहे.
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये समारोप होत आहे. 20 जानेवारीला हा मोर्चा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होईल आणि 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये ध्वजारोहण करुन यात्रेची सांगता होईल. भारत जोडो यात्रेचा भव्य समारोप करण्यासाठी, पक्षानं 24 समविचारी पक्षांना श्रीनगरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांना श्रीनगर येथील भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण पत्र पाठवलं आहे. भारत जोडो यात्रेच्या ग्रँड फिनालेसाठी काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहे. पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व श्रीनगरमध्ये उपस्थित राहणार असून त्यात काँग्रेस कार्यकारिणी (CWC) सदस्य, खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री यांचाही समावेश असेल, असे सांगण्यात येत आहे. यासाठी काँग्रेसनं श्रीनगरमध्ये सुमारे 200 खोल्या बुक केल्या आहेत.
30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता श्रीनगर येथे होणाऱ्या यात्रेच्या समारोप समारंभात उपस्थित राहण्यासाठी खर्गे यांनी 24 समविचारी पक्षांना आमंत्रित केलं आहे. खर्गे म्हणाले की, हा कार्यक्रम महात्मा गांधींच्या स्मृतीस समर्पित असेल. त्यांनी द्वेष आणि हिंसाचाराच्या विचारसरणीविरुद्ध आपल्या अथक संघर्षात याच दिवशी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या कार्यक्रमात आपण सत्य, करुणा आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, द्वेष आणि हिंसेशी लढण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करू.
विशेष म्हणजे, कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच राजकीय हालचाली आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळेल. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि या भागातील सर्वात मोठा चेहरा असलेल्या गुलाम नबी आझाद यांच्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसने श्रीनगरमध्ये आपली ताकद दाखवण्याची ही पहिलीच वेळ असेल.