काँग्रेसच्या सभेत तुफान राडा! तिकिटावरून कार्यकर्ते आपापसात भिडले; लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:12 PM2022-06-07T15:12:33+5:302022-06-07T15:26:49+5:30
Congress Video : तिकीटावरून कार्यकर्ते भिडले आणि अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेश महापालिका निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भोपाळ महापालिकेत नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या निवडीवरून बोलावलेल्या काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला आहे. नगरसेवक तिकिटावरून कार्यकर्ते भिडले आणि अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने नरेला विधानसभेतील प्रभाग क्रमांक 75, 76, 77, 78, 79 आणि 36, 37, 38, 39, 40 यासह 59, 70, 71, 59, 58, 44, 43 या प्रभागांची बैठक बोलावली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत नरेला विधानसभेशी संबंधित पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत प्रभागनिहाय दावेदारांनाही बोलावण्यात आले होते, मात्र वॉर्डाच्या दाव्यावरून काँग्रेसच्या दोन गटात वाद झाला.
माजी नगरसेवक मोहम्मद सगीर यांनी ज्या वॉर्डातून दावा दाखल केला त्या प्रभागात ते बाहेरचा माणूस असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काँग्रेस नेते महेंद्रसिंग चौहान यांच्या समर्थकांनी विरोध केला. यावरून मोहम्मद सगीरचे समर्थक आणि महेंद्रसिंग चौहान यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूंनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
सभेत ठेवलेले टेबलही फेकून देण्यात आले. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतरही कार्यकर्त्यांनी एकमत न झाल्याने आपला राग एकमेकांवर काढला, त्यानंतर बैठक रद्द करण्यात आली. काँग्रेस पक्ष उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रभागनिहाय बैठक बोलावत आहे. मात्र नरेला विधानसभेत नगरसेवकपदाच्या उमेदवाराबाबतचा गोंधळ काँग्रेससाठी अडचणीचा ठरला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.