आसाममध्ये काँग्रेसला मोठं भगदाड! राहुल गांधींची यात्रा पुढे सरकताच 150 नेते भाजपात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:57 AM2024-01-29T10:57:42+5:302024-01-29T10:58:36+5:30
मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून बाहेर पडताच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, AASU अर्थात ऑल आसाम स्टूडेंट्स युनियन आणि काँग्रेसच्या 150 हून अधिक नेत्यांनी भाजपचा भगवा हाती घेतला आहे. काँग्रेसची यात्रा सध्या तृणमूल काँग्रेसचे सरकार असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आहे.
मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यांनी रविवारी लिहिले की, 'मला हे मानावे लागेल की राहुल गांधी यांच्या भारत बस न्याय यात्रेने आसाममध्ये मोठा प्रभाव पाटला आहे. आसाम काँग्रेस आणि AASU च्या 150 हून अधिकन नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगाला निर्णय घेतला आहे.'
महत्वाचे म्हणजे, दत्ता यूथ काँग्रेस आसामच्या माजी अध्यक्ष होत्या. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर, एप्रिल 2023 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने (AICC) 'पक्षविरोधी कारवाई'चा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले होते.
याच मुद्द्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही काँग्रेरच्या या यात्रेवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, 'आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण पहिल्यांदाच अशी 'न्याय यात्रा' बघत आहोत. जी ज्या ठिकाणावरून जात आहे, तेथे पक्षाचा पराभव होत आहे आणि तेथील पक्ष कार्यकर्तेही त्यांची विचारधारा सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.'