७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:52 IST2025-02-09T14:47:18+5:302025-02-09T14:52:37+5:30

Delhi Assembly Election 2025 Congress Result: ७० जागांपैकी केवळ तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाची लाज राखली असून, डिपॉझिट वाचवण्यात त्यांना यश आले आहे.

big blow to congress delhi assembly election 2025 result party deposit confiscated in 67 out of 70 seats a hat trick of golden duck | ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!

७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!

Delhi Assembly Election 2025 Congress Result: सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर आज भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. परंतु, काँग्रेसचा हा भोपळाही आम आदमी पक्षाला भोवला आहे. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत. त्यातून खुद्द अरविंद केजरीवालही सुटू शकले नाहीत.

२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५३ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. तर भाजपला ३८.५१ टक्के मते होती. यंदा 'आप'ला ४३.६१ टक्के मते मिळाली आहेत. भाजप ४५.८८ टक्के मतांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. हा फरक फक्त २.२७ टक्क्यांचा असला तरी दिल्लीच्या सत्तेवर कब्जा मिळविण्यासाठी खूप मोठा ठरला.

७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अमानत रक्कम वाचवण्यात काँग्रेसचे तीनच उमेदवार यशस्वी ठरले. यामध्ये प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. यादवांना ४० हजारांहून अधिक मते मिळाली. दिल्लीच्या कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अभिषेक दत्त यांना त्यांचे डिपॉझिट वाचवता आले आहे. तसेच नांगलोई जाट ही तिसरी जागा आहे, जिथे काँग्रेसला आपले डिपॉझिट वाचवणे शक्य झाले आहे. बाकी ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६७ जागांवर काँग्रेसला डिपॉझिट रक्कमही वाचवता आलेली नाही.

१५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला १५ वर्षे एकही जागा जिंकता आलेली नाही

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर सत्तेवरून हाकलून लावण्यात आलेले सरकार आतापर्यंत पुन्हा सत्तेत येऊ शकलेले नाही. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या मतांचा वाटा दोन टक्क्यांहून अधिक वाढला आहे. काँग्रेसला सुमारे ६.४ टक्के मते मिळाली. तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४.२६ टक्के मते मिळाली. ही एकच गोष्ट काँग्रेससाठी काहीशी दिलासादायक मानली जात आहे. १९९८ ते २०१३ पर्यंत दिल्लीच्या राजकारणात सुवर्णकाळ पाहणाऱ्या काँग्रेसला सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या जनादेशाचा आम्ही विनम्रपणे स्वीकार करतो. मात्र दिल्लीच्या प्रगतीसाठी तसेच प्रदूषण, महागाई, भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचा लढा यापुढेही सुरूच राहील, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काही रिपोर्टनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सहा व्हिडिओ बनवले होते. या व्हिडिओना सुमारे ८२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. परंतु, प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसला केवळ ६ टक्केच मते मिळाली, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: big blow to congress delhi assembly election 2025 result party deposit confiscated in 67 out of 70 seats a hat trick of golden duck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.