राहुल आणि सोनिया गांधींना ED कडून मोठा धक्का, यंग इंडिया आणि AJL ची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 08:03 PM2023-11-21T20:03:39+5:302023-11-21T21:00:27+5:30
Enforcement Directorate : नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. तपास यंत्रणांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. तपास यंत्रणांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. AJL च्या मालमत्तेची एकूण किंमत ही ६६१.६९ कोटी रुपये आहे. ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये दिल्ली लखनौ आणि मुंबईतील मालमत्तांचा समावेश आहे. तर यंग इंडियाच्या मालमत्तेची किंमत ही ९०.२१ कोटी रुपये आहे. या प्रकरणामध्ये ईडीने दोन्ही नेत्यांची चौकशी केलेली आहे.
ईडीच्या या कारवाईवरून काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी या कारवाईबाबत म्हणाले की, ईडीकडून एजेएलच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये अटळ असलेल्या पराभवावरून लक्ष हटवण्यासाठीची त्यांची निराशा दर्शवित आहे.
ED has issued an order to provisionally attach properties worth Rs. 751.9 Crore in a money-laundering case investigated under the PMLA, 2002. Investigation revealed that M/s. Associated Journals Ltd. (AJL) is in possession of proceeds of crime in the form of immovable properties…
— ED (@dir_ed) November 21, 2023
या संदर्भात ईडीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, असोसिएटेड जर्नल कंपनीला वर्तमानपत्र प्रकाशित करण्यासाठी काही प्रमुख शहरात स्वस्त दरात भूखंड प्रदान करण्यात आला होता. मात्र, असोसिएटेड जर्नल कंपनीचे कामकाज २००८ साली बंद झाले व त्यानंतर या भूखंडांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, असोसिएटेड जर्नल कंपनीच्या मालकीची मालमत्ता हडपण्यासाठीच मे. यंग इंडियन या कंपनीची स्थापना झाल्याचा दावा देखील ईडीने केला आहे.