मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:28 PM2024-01-02T13:28:05+5:302024-01-02T13:34:03+5:30

वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो.

Big News Jagan Mohan Reddys sister will merge the party and join the Congress | मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

YS Sharmila to join Congress ( Marathi News ) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला धक्का देत सत्ता काबीज केल्यानंतर काँग्रेसने आपला मोर्चा आता आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना पक्षात घेण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला या आठवड्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर येत आहे. शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास पक्षविस्तारासाठी त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वायएस शर्मिला यांनी भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यानंतर जुलै २०२१ मध्ये वायएसआर तेलंगणा पक्षाची स्थापना केली होती. मात्र शर्मिला यांच्या पक्षाने नुकतीच झालेली तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. ही निवडणूक काँग्रेस जिंकण्याच्या स्थितीत असल्यामुळे आम्ही न लढण्याचा निर्णय घेतला, असं तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे वायएस शर्मिला यांची काँग्रेससोबतची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती आणि त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होणार असून वायएस शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपला पक्षही विलीन करणार आहेत.

काँग्रेसला होणार मोठा फायदा

जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आंध्र प्रदेशात काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. सध्या आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआरसीपी विरुद्ध चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. या संघर्षात बाजूला पडलेल्या काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारी फारच कमी झाली आहे. त्यामुळे वायएस शर्मिला यांना पक्षात घेत काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेशच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Big News Jagan Mohan Reddys sister will merge the party and join the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.