कट्टरता ही विषासमान, तिला कोणतीही सीमा नाही - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:34 PM2020-01-04T16:34:09+5:302020-01-04T16:34:13+5:30
पाकिस्तानात गुरु नानक यांच्या जन्मस्थळी ही गुरुद्वारा बांधण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर काल (दि.3) संध्याकाळी स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याच्या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही हा घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केले आहे.
"नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेला हल्ला निंदनीय आहे आणि त्यांचा निषेध केलाच पाहिजे. कट्टरता ही धोकादायक आणि जुने विष आहे, तिला कोणतीही सीमा नाही. प्रेम + एकमेकांचा आदर + समजणे हेच एकमेव औषध आहे." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनीही या घटनेचा निषेध ट्विटरवरून केला आहे.
The attack on Nankana Sahab is reprehensible & must be condemned unequivocally .
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 4, 2020
Bigotry is a dangerous, age old poison that knows no borders.
Love + Mutual Respect + Understanding is its only known antidote.
दरम्यान, पाकिस्तानात गुरु नानक यांच्या जन्मस्थळी ही गुरुद्वारा बांधण्यात आली आहे. तिचे पावित्र्य कायम राखण्यासाठी पाकिस्तान सरकारने योग्य ती पावले उचलावी असे भारताने म्हटले आहे. पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण फाळणीनंतर पाकिस्तानात गेले.
नानकाना साहिब गुरुद्वारा प्रमुखाची मुलगी जगजीत कौर हिचे तिच्या घरातून अपहरण करून धर्मांतर करण्यात आल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा वाद धुमसत होता. या मुलीचे अपहरण केल्याचा ज्याच्यावर आरोप आहे त्या मुलाच्या कुटुंबीयांनी संतप्त जमावाचे नेतृत्व केल्याचे समजते. तसेच, नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक करणाऱ्यांवर पाकिस्तान सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी भारताने केली आहे.