Bihar Politics : कन्हैया कुमार होणार बिहार काँग्रेसचा अध्यक्ष? ...म्हणून चर्चेत आहे नाव, जाणून घ्या काँग्रेसचं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:19 PM2022-04-15T18:19:20+5:302022-04-15T18:20:07+5:30
मदन मोहन झा यांनी जवळपास चार वर्षे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी गुरुवारी दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला.
काँग्रेस नेते मदन मोहन झा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बिहार काँग्रेसवर नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी आली आहे. मदन मोहन झा यांनी जवळपास चार वर्षे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी गुरुवारी दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, यासंदर्भात प्रदेश काँग्रेसने कुठल्याही प्रकारचे औपचारिक वक्तव्य केलेले नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात आला तर कन्हैया कुमारही पक्षाची पसंत असू शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.
बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसचा मार्ग वेगळा होण्याचे एक कारण, कन्हैया कुमारशी संबंधित असल्याचे बोलले जाते. कारण येथे कन्हैया कुमारला तेजस्वी यादवचा तुल्यबळ प्रतिस्पर्धक मानले जाते. कन्हैया कुमार हा भूमिहार वर्गातील आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील असंतुष्ट तरुणांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो, असे पक्षाला वाटते.
मात्र, याच वर्गातील अनुभवी नेतेही शर्यतीत आहेत. यात श्याम सुंदर सिंग धीरज आणि अजित शर्मा यांचीही नावे आहेत. सध्या धीरज हे प्रदेश काँग्रेसचे कार्यवाह अध्यक्षही आहेत, तर शर्मा हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.
यासंदर्भात काँग्रेस महासचिव तारिक अनवर 'पीटीआय-भाषा' सोबत बोलताना म्हणाले, नवीन प्रदेशाध्यक्षासंदर्भात हायकमांड संभाव्य नावांवर विचार करत आहे. योग्य वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र, अन्वर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, पण पक्षाच्या सूत्रांनी दावा केला आहे, की नवीन प्रदेश काँग्रेसाध्यक्ष मुस्लीम अथवा दलित असेल किंवा भूमिहार सारख्या उच्च वर्गाच्या नेत्याचीही या पदासाठी निवड केली जाऊ शकते.