भाजपा, संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम सुरूय- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 04:38 PM2018-06-11T16:38:33+5:302018-06-11T16:38:33+5:30
ओबीसी समुदायाशी संवाद साधताना राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली: भाजपा आणि संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. ओबीसी समुदायाशी संवाद साधताना राहुल यांनी भाजपा आणि संघाला लक्ष्य केलं. 'संघाकडून देश विभागण्याचं काम केलं जातं आहे. त्यांना ओबीसी समुदायातही फूट पाडायची आहे,' असा हल्लाबोल राहुल यांनी केला. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी संमेलनात बोलत होते.
मोदी सरकारकडून ओबीसी समुदायाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला. 'काँग्रेसमध्ये इतर मागासवर्गीय जातींना योग्य तो सन्मान दिला जातो. मात्र भाजपामधील स्थिती तशी नाही. सध्या देशात जी व्यक्ती काम करते, तीच मागे राहते अशी स्थिती आहे. एखादी व्यक्ती काम करते, मात्र श्रेय दुसरीच व्यक्ती लाटते, असं चित्र सध्या देशात आहे. ज्याच्याकडे कौशल्य आहे, जो कष्ट करत आहे, त्याला योग्य तो सन्मान दिला जात नाही,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 'मोदी सरकारनं शेतकऱ्यांना एक रुपया दिला नाही. मात्र याच सरकारनं 15 उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. देशातील तरुणांनी कौशल्य आत्मसात करायला हवं, असं मोदीजी म्हणतात. मात्र देशातील तरुणांमध्ये कौशल्याची कमतरता नाही. मात्र त्यांच्या कौशल्याचा सन्मान केला जात नाही. भाजपामध्ये ओबीसींचं मत विचारात घेतलं जात नाही. मात्र काँग्रेसमध्ये ओबीसींना योग्य सन्मान दिला जातो', असं राहुल यावेळी म्हणाले.