...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 05:01 PM2019-08-28T17:01:41+5:302019-08-28T17:05:56+5:30
काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी काश्मीरबाबतचे आपले विधान मनापासून नव्हे तर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बदलले, असा टोला भाजपाने लगावला आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे बनले आहेत. त्यांच्या विधानाचा शेजारील देशाकडून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात वापर होत आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसने याप्रकरणी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाने केली आहे.
कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक विधाने केली होती. याच विधानाचा वापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला आहे. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला.
राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलल्यानंतर भाजपाकडून त्यावर जोरदात टीका करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसामाध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर चौफेर हल्ला केला. ''राहुल गांधी यांनी केलेली विधाने दिवाळखोरीचे लक्षण आहे. काश्मीरमध्ये जे घडले नाही, ते राहुल गांधी बोलले आहेत. ते पाकिस्तानच्या हातचे खेळणे बनले आहेत. त्यांच्या विधानाचा आधार घेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पत्र दिले आहे. त्यानंतर विरोधाचा सूर उमटू लागल्यावर राहुल गांधी यांनी यू टर्न घेतला आहे.'' अशी टीका जावडेकर यांनी केली.
राजकीय वातावरण पाहता राहुल गांधींनी पुन्हा एकदा ट्वीट करून स्पष्ट केलं आहे की, काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे पाकिस्तानसह इतर देशांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये त्यासोबत काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी के बयान को सबूत बनाते हुए पाकिस्तान ने यूएन में एक पेटिशन लगाई है।
— BJP (@BJP4India) August 28, 2019
ये दिवालियापन तो है ही साथ ही कांग्रेस की वोटबैंक की राजनीति भी है।
इस बयान से जब देशभर के लोगों का गुस्सा सामने आया तो राहुल गांधी को आज बयान से यू-टर्न लेना पड़ा: श्री @PrakashJavdekarpic.twitter.com/XLoIQaFkBc
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलल्यानंतर पाकिस्तानचे सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. फवाद हुसैन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, तुमचं गोंधळलेलं राजकारण ही मोठी समस्या आहे. तुमची भूमिका वास्तववादी असणं गरजेचे होते. तुम्ही तुमच्या आजोबांकडून बोध घ्यायला हवा होता. त्यांनी भारतात धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचारांचे प्रतिनिधित्व केले. फवाद यांनी आपल्या ट्वीटसोबत एक शायरीही सांगितली आहे.