भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार
By देवेश फडके | Published: February 12, 2021 04:21 PM2021-02-12T16:21:54+5:302021-02-12T16:24:35+5:30
भारत-चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (bjp counterattack on rahul gandhi on india china border dispute)
भारताची जमीन चीनला कोणी दिली? हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपले आजोबा म्हणजेच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना विचारावे. राहुल गांधींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हेही राहुल गांधीना समजेल. जनतेला सर्व काही माहिती आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर सरकारचा पलटवार; केंद्रीय मंत्री म्हणाले 'कुंदबुद्धी' पप्पू
राहुल गांधींमध्ये परिपक्वतेचा अभाव
राहुल गांधी यांच्या विधानातून असंसदीयपणा आणि परिपक्तवतेचा अभाव दिसून येते, अशी टीका केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी केली आहे. राहुल गांधींना काही समजत नाही आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाहीत, असा दावाही सिंह यांनी केला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय भूमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. चीनसाठी त्यांनी भारताची जमीन सोडून दिली. पंतप्रधान मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
दरम्यान, राहुल गांधी यांनी भारत-चीन डिसएंगेजमेन्टवर दिलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, कुंदबुद्धी पप्पूजींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यावर काही उपचार नाही, असा गंभीर आरोप मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.