"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 08:16 AM2024-12-01T08:16:17+5:302024-12-01T08:18:06+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.
Congress BJP EVM News: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. काँग्रेसकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली गेली असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या आरोपाला भाजपने उत्तर दिलं आहे.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधींना लक्ष्य केले. "काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राहुल गांधींसह इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा आणि जाहीर करायला हवं की, ते मतपत्रिकेवर निवडणुका होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही", असे भाटिया म्हणाले.
"असेच बोलत राहिले, तर त्यांच्याकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यांनी असं केलं नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे आरोप बिनवुडाचे ठरतील", असेही गौरव भाटिया म्हणाले.
"काँग्रेसने हा मुद्दा घेऊन न्यायालयात जायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी वेळा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएम मशीनच्या बाजूने निकाल दिला आहे. हा केवढा मोठा विरोधाभास आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी त्याच दिवशी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले, ज्या दिवशी प्रियांका गांधी लोकसभेत शपथ घेत होत्या", अशा शब्दात भाटिया यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.