भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये द्रौपदी मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:35 PM2022-07-22T15:35:52+5:302022-07-22T15:36:39+5:30
President Election Result: केरळमध्ये भाजपाच्या द्रौपदी मुर्मु यांना एक मत मिळालं आहे. देशातील अनेक राज्यांत मुर्मूंच्या बाजूने झालेल्या क्रॉस व्होटिंगदरम्यान, केरळमध्ये मिळालेल्या या मताबद्दल भाजपाने आनंद व्यक्त केला आहे.
तिरुवनंतपुरम - राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांन ऐतिहासिक विजय मिळवला. मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभूत केले. एकीकडे भाजपाशासित राज्यात, तसेच मुर्मूंना पाठिंपा जाहीर करणाऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये द्रौपदी मुर्मू यांना प्रचंड मतदान झालं आहे. मात्र आता चर्चा सुरू आहे ती भाजपाचा एकही आमदार नसलेल्या केरळमध्ये द्रौपदी मुर्मू यांना झालेल्या मतदानाची. केरळमध्ये भाजपाच्या द्रौपदी मुर्मु यांना एक मत मिळालं आहे. देशातील अनेक राज्यांत मुर्मूंच्या बाजूने झालेल्या क्रॉस व्होटिंगदरम्यान, केरळमध्ये मिळालेल्या या मताबद्दल भाजपाने आनंद व्यक्त केला आहे.
१४० सदस्यसंख्या असलेल्या केरळच्या विधानसभेमध्ये भाजपाचा एकही आमदार नाही आहे. दरम्यान, केरळमधील सत्ताधारी असलेले डावे पक्ष आणि विरोधक काँग्रेसने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे केरळमधील सर्वच्या सर्व मतं यशवंत सिन्हा यांना मिळणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आश्चर्यकारकरीत्या एक मत मिळाल्याने काँग्रेस आणि डाव्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने द्रौपदी मुर्मू यांना नेमकं कोणी मत दिलं, याचा शोध घेणं कठीण आहे. हे एक मत द्रौपदी मुर्मू यांना संबंधित आमदाराने नजरचुकीनं दिलं की मुद्दामहून त्यांना मतदान केलं, याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
आता भाजपाच्या केरळमधील प्रदेश कार्यकारिणीने या अनपेक्षित मतासाठी आनंद व्यक्त केला आहे. भाजपाचे केरळमधील प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले की, द्रौपदी मुर्मू हिला जे एक मत केरळमधून मिळाले आहे, त्याचं मूल्य हे इतर १३९ मतांपेक्षा अधिक आहे. हे नकारात्मकतेविरोधात एक सकारात्मक मत आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झालं. त्यांना ६४ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली. तसेच मुर्मू यांना १७ खासदार आणि १२६ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली.