राजीव गांधीच सामूहिक हत्याकांडाचे जनक; पोस्टरमधून भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:03 AM2018-08-28T11:03:23+5:302018-08-28T11:08:09+5:30
राहुल गांधी यांच्या शीखविरोधी दंगलीबद्दलच्या विधानानंतर भाजपा आक्रमक
नवी दिल्ली: 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विधानानंतर आता भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाचे प्रवक्ते यांनी तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत पोस्टर्स लावून राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 'राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग' म्हणजेच जमावाकडून होणाऱ्या हत्याकांडाचे जनक-राजीव गांधी असा मजकूर असलेले पोस्टर्स बग्गा यांनी दिल्लीत लावले आहेत. दिल्लीच्या चौकाचौकात लावण्यात आलेल्या या पोस्टर्सचा व्हिडीओ बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून अनेकदा करण्यात आला आहे. गोहत्या, गायींची वाहतूक, गोमांस अशा विविध मुद्यांवरुन जमावाकडून हत्या झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. यावरुन काँग्रेसनं मोदी सरकारवर वारंवार टीका केली आहे. या टीकेला आता भाजपानं आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. राजीव गांधीच मॉब लिचिंगचे जनक असल्याचे पोस्टर लावत भाजपानं काँग्रेसवर पलटवार केला आहे.
Yes Rajiv Gandhi is Father of Mob Lynching pic.twitter.com/8OAw7vOn2X
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) August 27, 2018
लंडन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शीख दंगलीबद्दल विधान केलं होतं. 1984 मध्ये झालेलं शीखविरोधी हत्याकांड अतिशय वेदनादायी होतं. कोणाही विरोधात कोणतीही हिंसा करणाऱ्यांना 100 टक्के शिक्षा व्हायला हवी. मात्र या हत्याकांडात काँग्रेसचा सहभाग नव्हता, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या चर्चासत्रात बोलताना राहुल यांनी हे वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या या विधानावर भाजपा, आप आणि शिरोमणी अकाली दलानं जोरदार टीका केली होती.